फेरनियोजनात तात्पुरता दिलासा
By admin | Published: September 5, 2015 01:30 AM2015-09-05T01:30:35+5:302015-09-05T01:30:35+5:30
पहिल्या पर्वणीच्या कडेकोट बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक
नाशिक : पहिल्या पर्वणीच्या कडेकोट बंदोबस्तामुळे फसलेल्या नियोजनाची जाहीर कबुली देत येत्या १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची वाहतूक व्यवस्था व शहरवासीयांचे हाल कमी करण्यासाठी फेरनियोजन करण्याचे प्रशासनाने ठरविले. मात्र नाशिक रोडला येणाऱ्या भाविकांची पायपीट कमी करण्यासाठी त्यांना लक्ष्मीनारायण घाटापर्यंत आणण्याचे व शहरांतर्गत काही रस्त्यांवर बस वाहतूक सुरू ठेवण्याचे तात्पुरते पर्याय सुचविण्यात आले आहेत.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आली. १२ व १३ सप्टेंबर रोजी अमावास्या असल्याने दोन दिवस भाविकांची स्नानासाठी गर्दी होईल असा अंदाज असला तरी १२ रोजी पोळा सण व सध्या दुष्काळाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील भाविक येण्याची शक्यता कमी आहे; परंतु परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील, असे या बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रकारच्या सूचना तसेच काही तक्रारीही केल्या, त्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. (प्रतिनिधी)
पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने मागील शाही मिरवणूक व शाहीस्नानासाठी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागली. परराज्यातून येणाऱ्या भाविकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांना शाहीस्नान करणे अवघड झाले.
या नियोजनात पोलीस प्रशासनाने बदल न केल्यास खालशाचे २०० युवा साधू-महंत शाहीस्नानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा छत्तीसगड मंडप खालशाचे रामबालकदास महाराज यांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाने केलेले नियोजन भाविकांसाठी सुरक्षा होती की कर्फ्यू होता, हेच कळले नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्र्यंबकच्या साधुग्राममध्ये श्वानाचा हैदोस
त्र्यंबकेश्वर रोडवर पेगलवाडी फाट्याजवळील साधुग्राममध्ये गुरुवारी सकाळी एका भटक्या श्वानाने हैदोस घातला़ या श्वानाने साधू-महंत तसेच साधुग्राममध्ये आलेल्या तब्बल २९ जणांना चावा घेतला आहे़ त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे. या भटक्या श्वानाची त्र्यंबकेश्वरमध्ये दहशत पसरली आहे़
त्र्यंबकेश्वरच्या साधुग्राममधील काही साधू-महंत हे गुरुवारी सकाळच्या सुमारास त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी चालले होते, तर काही भाविक या ठिकाणी सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांसाठी आलेले होते़ यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने भविकांसह साधू-महंतांना चावा घेण्यास सुरुवात केली़
आवाहन आखाड्यातील नित्यानंद पुरी महाराज व स्वरूपानंद महाराज शिबिरातील रुद्रप्रकाश अवस्थी महाराज या दोघांसह पेगलवाडीतील अल्पवयीन मुलगा गणेश सिरसाठे यांना या कुत्र्याने अधिक प्रमाणात चावा घेतल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ भटक्या कुत्र्यांच्या या समस्येवर तातडीने उपाय काढण्याची मागणी सर्वत्र करण्यात येत आहे.