सोलापूर जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद
By appasaheb.patil | Published: August 9, 2019 11:51 AM2019-08-09T11:51:28+5:302019-08-09T11:57:55+5:30
महावितरण : पुरामुळे नादुरुस्त वीज मीटर स्वखर्चाने बदलणार
सोलापूर : ज्या ठिकाणी पुरामुळे महावितरणच्या ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत, अशा वीज ग्राहकांचे वीज मीटर स्वखर्चाने बदलून देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील काही भागातील पूरस्थितीमुळे १३१ वीज वाहिन्यांच्या वीज पुरवठ्यावर अंशत: परिणाम झाला असून, धोका टाळण्यासाठी जिल्ह्यातील १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शहरी भागातील २२ व ग्रामीण भागातील १९३६ असे एकूण १९५८ रोहित्रांचा वीजपुरवठा पुराच्या पाण्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रामुख्याने कृषी पंपधारकांसह सुमारे २१ हजार ९०० ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे. पुराच्या पाण्याचा धोका निवळताच या रोहित्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.
अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीज मीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीज मीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे. वीज मीटर बदलण्याचे काम त्या-त्या भागातील पूरस्थिती निवळताच करण्यात येईल. पावसामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती असून, पावसाचे पाणी साचल्यामुळे वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येतो. या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने पंढरपूर विभागासह इतर अनेक भागात पूरस्थितीमुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सुरक्षेसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून, पाणी कमी झाल्यास पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल़ या काळात महावितरणच्या वतीने अभियंते, अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अशावेळी ग्राहकांनी संयम बाळगावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडळ