दहा फरार पोलीस शरण

By admin | Published: December 28, 2016 01:13 AM2016-12-28T01:13:16+5:302016-12-28T01:13:16+5:30

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव खून प्रकरणातील १० फरार पोलीस मंगळवारी कऱ्हाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण आले.

Ten absconding police surrender | दहा फरार पोलीस शरण

दहा फरार पोलीस शरण

Next

कऱ्हाड (जि. सातारा) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील सराफ व्यावसायिक रावसाहेब जाधव खून प्रकरणातील १० फरार पोलीस मंगळवारी कऱ्हाड जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण आले. राज्य गुप्तचर विभागाने अटक करुन न्यायालयापुढे उभे केल्यानंतर त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हणमंत लिंगाप्पा काकंडकी, दिलीप मारुती क्षीरसागर, सुधीर सुभाष जाधव, राजकुमार भीमाशंकर कोळी, अतुल संपतराव देशमुख, नितीन चंद्रकांत कदम, सुमीत विजय मोहिते, शरद सोमाजी माने, संजय मानाजी काटे, अमोल अर्जुन पवार अशी त्यांची नावे आहेत.
खासगी बसमधून ७७ लाखांचे अडीच किलो सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना मे २०१६ मध्ये कऱ्हाडात घडली होती. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास धस तपास अधिकारी होते. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह सहा पोलिसांनी संशयित रावसाहेब जाधवसह त्याचा मेहुणाअनिल दशरथ डिकोळे (वय ३६, रा. घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) याला ताब्यात घेऊन कऱ्हाडात आणले. १८ जून रोजी तपासकामी त्या दोघांना घेऊन पोलीस कार्वेनाका चौकीत गेले होते. त्याठिकाणी प्रकृती खालावल्याने जाधवला उपचारार्थ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचदिवशी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. रावसाहेबचा मृत्यू झाल्याचे समजताच करमाळा येथील शेकडोंचा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला. तहसील कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला. अखेर पोलिस अधीक्षकांनी निरीक्षक धस यांच्यासह १२ पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित केले. तेव्हापासूनसर्व आरोपी फरार होते. (प्रतिनिधी)

दीड तास युक्तिवाद
सहायक पोलीस निरीक्षक हणमंत काकंडकी यांच्यासह संबंधित दहा पोलीस स्वतंत्रपणे न्यायालयाच्या आवारात दाखल झाले. तेथून सर्वजण एकत्रित प्रथम वर्ग न्यायाधीशांसमोर हजर झाले. त्यानंतर सुमारे दीड तास सरकार पक्षासह बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होता.

Web Title: Ten absconding police surrender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.