दहा-वीसच्या मळक्या आणि फाटक्या नोटाच सुसाट!
By Admin | Published: November 13, 2016 09:29 PM2016-11-13T21:29:13+5:302016-11-13T21:32:24+5:30
ओ दादा... ही नोट फाटलीय, दुसरी द्या..., आमच्याकडनं कोण घेत नाही बघा..., असले संवादच रविवारच्या आठवडा बाजारात ऐकायला मिळाले नाही.
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 13 - ओ दादा... ही नोट फाटलीय, दुसरी द्या..., आमच्याकडनं कोण घेत नाही बघा..., असले संवादच रविवारच्या आठवडा बाजारात ऐकायला मिळाले नाही. शेतकरी, व्यापारी अन् ग्राहक शहाण्यासारखं वागत होते. साहेब मळकी, फाटकी नोट असली तरी द्या; पण पाचशे, हजारांची नको. असे शेतकरी म्हणत आहेत.
भारतीय चलनातून पाचशे अन् हजारांच्या नोटा मंगळवारी रात्रीपासून अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच अर्थकारणावर जबर फटका बसला आहे. पहिल्या दोन-तीन दिवसांत तर अनेकांना चहा, नास्टा करण्यासाठीही अवघड झाले होते. या घटनेला पाच-सहा दिवस झाले तरी अजून फारशी परिस्थितीत बदललेली नाही. पण यातून सातारकर मात्र सावरत आहेत.
जुना मोटार स्टॅण्ड परिसरात रविवारच्या बाजारात थेट शेतकरीच माल विकण्यासाठी येतात. त्यातच शाळा-महाविद्यालय, नोकरदारांना साप्ताहिक सुटी असल्याने या बाजारात दर रविवारी तुफान गर्दी असते.
ऐतिहासिक या निर्णयानंतर रविवारी प्रथमच आठवडा बाजार भरला होता. दरवेळीसारखी गर्दीच यंदा दिसत नव्हती. सर्वत्र तुरळक ग्राहक दिसत होते. शेतकरी, व्यापारी प्रथमच ग्राहकांकडे सुटे पैसे आहेत ना? अशी विचारणा करत होते. त्यानंतरच पुढील व्यवहार होत होते.
कांदा-बटाटा वाल्यांकडं पाचशे चालते
कांदा-बटाटे विक्री करणारे व्यापारीच अधून-मधून एखादा ग्राहक पाचशेची नोट दिली तर ते घेत होते. ग्राहकांनी पाचशेची नोट आहे, असे सांगितले असता पहिला प्रश्न विचारला जायचा. ह्यकिती घेणार?ह्ण मोठा ग्राहक असला तर हे व्यापारी पाचशेची नोट घेत होते. कोणी काही विचारलंच तर कष्टाचा पैसा हाय? त्याला काय घाबरायचं. बँकेत जमा करू की, असे सांगितले जात होते.
किरकोळ नोटा आल्या बाहेर
पाचशेच्या नोटा रद्द झाल्यानंतर कसं होईल?, असं वाटलं जात होतं. याचा फटका आठवडा बाजाराला बसलाही. पण जे ग्राहक आले त्यातील बहुतांश जणांकडे दहा, वीस, पन्नासच्या नोटा पाहावयास मिळत होत्या.
चाळीसची वस्तू वीसला...
शेतकऱ्यांनाही आणलेला माल विकायचा होता. त्यातच ग्राहकांची संख्या रोडावलेली. त्यामुळे बहुतांश वस्तूंच्या किमती कमी होत्या. परंतु हुशार ग्राहक त्यातूनही किमती पाडून मागत होते. अशा वेळी ग्राहक सोडण्यापेक्षा चला घ्या... म्हणून माल दिला जात होता.