दोन अपघातांत राज्यात १० ठार
By admin | Published: March 4, 2016 03:11 AM2016-03-04T03:11:29+5:302016-03-04T03:11:29+5:30
दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत राज्यातील १० जणांना जीव गमवावा लागला. पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळजवळ (जि. सातारा) जीप उलटून चार तरुण मृत्युमुखी पडले.
सातारा़/चंद्रपूर : दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत राज्यातील १० जणांना जीव गमवावा लागला. पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळजवळ (जि. सातारा) जीप उलटून चार तरुण मृत्युमुखी पडले. तर चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. ते सर्व मध्य प्रदेशातील पचमढी येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी जात असताना हैदराबाद जिल्ह्यातील पिपरिया येथे हा अपघात झाला.
शिरवळजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे जीप पलटी होऊन अपघात झाला. बुधवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. गणेश बोणे (१९), दस्तगीर नबीलाल नाकनिगल (२८, दोघे रा. सारोळा, ता. भोर, जि. पुणे), अतुल बरकडे (३०, रा. गुणंद, ता. भोर), प्रशांत राऊत (२५, रा. राऊतवाडी, ता. भोर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत; तर जीपचालक हनुमंत निगडे (२८, रा. भोंगवली, ता. भोर) व जीपमधून बाहेर पडलेले अमित पवार (१९, रा. सारोळा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत जिवलग मित्र होते.
मध्य प्रदेशातील पचमढी येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी चाललेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात सहा भाविक जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले. चालकाला पहाटेची चालकाला डुलकी लागल्याने ही दुर्घटना घडली.
जगदीश मोहितकर (३५), रमेश पोतनूरवार (४५), पंचफुला भाऊराव निमसरकार (४५) सर्व माथा (ता. कोरपना, जिल्हा चंद्रपूर), सुशीला शेडमाके (५५), मनीषा संधू (२८), सिमरण संधू (४) (सर्व रा. रामपूर ता. राजुरा, जिल्हा चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. तर उषा मोहितकर (३२), वंदना पोतनूरवार (३५), सुषमा हंसकर (३४), सुरेश हंसकर (३६), दिव्यानी मोहितकर (५) आणि चालक संजय तुलावी (३५) रा. चुनाळा हे सर्व जखमी आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)