संजय राऊत यांची दहा तास ईडी चौकशी; तपास अधिकाऱ्यांना दिली सर्व प्रश्नांची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 09:23 AM2022-07-02T09:23:37+5:302022-07-02T09:26:03+5:30
ईडीने यापूर्वी २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींपासून मला दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक ईडीने ही नोटीस पाठविल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांची शुक्रवारी ईडीने दहा तास चौकशी केली. राऊत दुपारी १२ वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले होते आणि रात्री दहाच्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासात १०३९ कोटी रुपयांचा घोटाळा तसेच मनी लाँड्रिंग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने ही चौकशी सुरू केली आहे. संजय राऊत चौकशीसाठी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ‘कर नाही त्याला डर कशाचा’, असे म्हणत संजय राऊत कार्यालयात शिरले.
ईडीने यापूर्वी २८ जून रोजी राऊत यांना पहिले समन्स जारी केले होते. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींपासून मला दूर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक ईडीने ही नोटीस पाठविल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांच्या वकिलाने ईडी कार्यालय गाठत ज्या मुद्यांची चौकशी करायची आहे, त्याकरिता लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्याची विनंती अधिकाऱ्यांना केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळत दुसरे समन्स जारी करत राऊत यांना शुक्रवारी, १ जुलै रोजी हजर होण्यास सांगितले.
गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासामधे १०३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोप करत सन २०१८ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत, राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान यांच्या विरोधातही तक्रार म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली होती. नंतर या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे ईडीने हाती घेतली. या प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना यापूर्वीच ईडीने अटक केली आहे. या प्रकरणी राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेला दादर येथील फ्लॅट तसेच रायगड जिल्ह्यातील किहिम गावातील ८ भूखंडांची ईडीने एप्रिल महिन्यात तात्पुरती जप्ती केलेली आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे जे प्रश्न विचारले त्याची मी सविस्तर उत्तरे दिली आहेत. तपास यंत्रणेशी पूर्णपणे सहकार्य केलेले आहे. गरज भासली तर मी पुन्हा येईन.
- संजय राऊत, शिवसेना नेते