दहा लाख चारचाकी गाड्या

By admin | Published: March 21, 2017 03:44 AM2017-03-21T03:44:23+5:302017-03-21T03:44:23+5:30

उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण

Ten lakh four-wheelers | दहा लाख चारचाकी गाड्या

दहा लाख चारचाकी गाड्या

Next

मुंबई : उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण आहे. मुंबईतील चारचाकी वाहनांची संख्या १० लाखांवर गेल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे.
नुकताच विधिमंडळात राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्यात सर्व प्रकारची एकूण २ कोटी ९० लाख वाहने आहेत. त्यापैकी तब्बल १० टक्के म्हणजे २९ लाख वाहने एकट्या मुंबईत आहेत. त्यातही चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईत जानेवारी २०१६पर्यंत नऊ लाख ३० हजार चारचाकी वाहने होती. पण गेल्या एका वर्षात यात ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या १० लाख २७ हजार चारचाकी वाहने आहेत.
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली, तरी ती वाहून नेण्यासाठी रस्त्यांची लांबी मात्र ठरावीक मर्यादेबाहेर वाढविणे शक्य नाही. मुंबईत आजही फक्त दोन हजार किलोमीटर लांबीचेच रस्ते आहेत. वाहनांची संख्या आणि रस्त्यांच्या लांबीबाबत असणाऱ्या या व्यस्त समीकरणामुळे वाहनांच्या बाबतीत मुंबई देशातील सर्वाधिक घनतेचे महानगर ठरले आहे.
मुंबईत प्रति शंभर मीटर १४१ वाहने उभी राहू शकतात. तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त ३६ आहे. नागपूरपाठोपाठ ठाण्यात ३३ तर पुण्यात २६ वाहने उभी राहतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत पार्किंगसाठीही जागा उरलेली नाही. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी सोसायटीबाहेरील पदपथांवरच वाहने उभी केली जातात. (प्रतिनिधी)
एकीकृत वाहतूक व्यवस्थेचाच पर्याय -
प्रचंड गर्दीमुळे बेस्ट बसेस आणि लोकल गाड्यांचा प्रवास जिकिरीचा ठरतो. संख्या आणि सुविधेच्या बाबतीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नकोशी झाल्यानेच अनेक जण खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. त्यामुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
हा ताण कमी करण्यासाठी सुखकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा मागणी तज्ज्ञांनी लावून धरली आहे. मेट्रो आणि मोनो प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असून, सर्व वाहतूक व्यवस्था एकमेकांशी जोडण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करायचा असेल तर एकीकृत वाहतूक व्यवस्थेशिवाय पर्याय नाही.

Web Title: Ten lakh four-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.