आघाडीचे दहा जण विधान परिषदेवर
By admin | Published: June 8, 2014 02:17 AM2014-06-08T02:17:44+5:302014-06-08T02:17:44+5:30
काँग्रेसच्या 4 जणांची आणि राष्ट्रवादीच्या 6 जणांची शनिवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती केली.
Next
>राज्यपाल नियुक्त सदस्य : काँग्रेसच्या 4 तर राष्ट्रवादीच्या 6 जणांची नियुक्ती
मुंबई : काँग्रेसच्या 4 जणांची आणि राष्ट्रवादीच्या 6 जणांची शनिवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती केली. त्यात काँग्रेसतर्फे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामहरी रुपनवार आणि सचिव हुस्नबानो खलिफे यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीतर्फे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट या औषध विक्रेता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ उपाख्य अप्पासाहेब शिंदे, यवतमाळ जिल्ह्यातील ख्वाजा बेग, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गजभिये, शेळीमेंढी महामंडळाचे अध्यक्ष हिंगोलीचे रामराव वडकुते आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले राहुल नाव्रेकर यांचा समावेश आहे. काँग्रेसचे आनंदराव पाटील हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जातात. रुपनवार हे धनगर समाजाचे असून, सोलापूरचे आहेत. माढा, बारामती, सोलापूर, सांगली मतदारसंघात महादेव जानकर यांच्या माध्यमातून धनगर समाज महायुतीच्या मागे उभा राहिल्याचे चित्र होते. जानकर यांना शह देण्यासाठी उद्योजक रुपनवार यांना संधी दिल्याचे मानले जाते. हुस्नबानो खलिफे कोकणातील आहेत. राष्ट्रवादीकडून आमदार झालेले ख्वाजा बेग 1999मध्ये विधानसभा निवडणुकीत केवळ 136 मतांनी पराभूत झाले होते. प्रकाश गजभिये नागपूरचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. पूर्वी ते अनेक वर्षे रिपाइंच्या आठवले गटात सक्रिय होते. वडकुते हेही धनगर समाजाचे आहेत.
काँग्रेसच्या दोन जागा अडल्या
काँग्रेसच्या कोटय़ातील सहापैकी चार आमदार निश्चित झाले असले तरी दोन आमदार अजून ठरायचे आहेत. जाहीर चार नावांपैकी एकही विदर्भातील नाही. इच्छुकांच्या गर्दीतून नावे ठरविण्यात अडचणी येत आहेत. (विशेष प्रतिनिधी)