दहा लाखांचे मिथेड्रीन जप्त
By admin | Published: March 23, 2017 02:52 AM2017-03-23T02:52:45+5:302017-03-23T02:52:45+5:30
पालघर-बोईसर रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील रेनबो पेंट अँड रेझिन या कंपनीवर मुंबईच्या महसूल गुप्तचर संचनालायाने धाड
हितेन नाईक / पालघर
पालघर-बोईसर रोडवरील औद्योगिक वसाहतीमधील रेनबो पेंट अँड रेझिन या कंपनीवर मुंबईच्या महसूल गुप्तचर संचनालायाने धाड टाकून दहा लाखाचे मिथेड्रीन जप्त केले. तसेच कंपनीच्या मालकासह ४ जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एका अभिनेत्रीचाही संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पालघर तालुका औद्योगिक वसाहतीमध्ये पेंट बनवणारी ही कंपनी पालघरच्या रघुवीर पाटील यांची असून त्याने काही महिन्यांपूर्वी आपल्या कंपनीतील काही भाग भाडे तत्वावर भानुदास मोरेला वापरण्यास दिला होता. रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चर्चगेट येथील महसूल गुप्तचर संचलनालयाच्या युनिटने अचानक धाड घातली. त्यावेळी काही लोक मिथेड्रीन बनवित असल्याचे निदर्शनास आले. ते द्रव रूपात असल्याने त्याची पावडर बनविण्याची प्रक्रि या सुरु असतानाच धाड घालून त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणातील प्रमुख आरोपीला गुप्तचर संचालनालयाने काही वर्षापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे युनिट त्याच्या पाळतीवर होते. पालघर च्या पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, पोलीस निरीक्षक संजय हजारे, सहा. पो. नि. दीपक साळुंखे स्थानिक गुन्हे शाखेचे व्हनमाने यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या परिसरात अशा घटना सातत्याने घडत आहेत. एकांतवास असणाऱ्या मोक्याच्या जागा हेरून देशद्रोही कारवाया पालघर जिल्ह्यात होत असून या कारवायांची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.