साता-यात टेम्पो अपघातात 18 जणांचा मृत्यू, 19 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 06:48 AM2018-04-10T06:48:18+5:302018-04-11T06:35:22+5:30
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात 35 कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो एस कॉर्नरवर उलटला. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात 18 जण ठार तर 20 जखमी झाले.
खंडाळा (जि. सातारा) : पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटातील ‘एस’ वळणावर टेम्पो उलटून १८ मजूर ठार,
तर १९ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. मृतांमध्ये सात महिलांसह दोन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. चालकाला ‘एस’ वळणाचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात झाला. टेम्पोतील बांधकामाच्या साहित्याखाली दबले गेल्याने मृतांची संख्या वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.
विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून ३७ कामगारांना घेऊन हा टेम्पो शिरवळच्या औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता. टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी लागणारे साहित्य होते. या साहित्यासह ३७ जण दाटीवाटीने बसले होते. यातील बरेच जण झोपेत होते. टेम्पो पहाटे खंबाटकी बोगदा ओलांडून ‘एस’ वळणावर आल्यावर चार फुटी कठड्याला जोरात धडकून रस्त्याबाहेर फेकला गेला. १७ जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींवर साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
>मृतांची नावे
महादेवी अनिल राठोड (वय ४५, नागठाणे, ता. जि. विजापूर), रेखू शंकर चव्हाण (५५), संतोष काशिनाथ नायक (३२), मंगलाबाई चंदू नायक (४२, तिघे रा. हडगली, विजापूर), कृष्णा सोनू पवार (५०, राजनाळ तांडा), किरण विठ्ठल राठोड (२७), देवाबाई मोहन राठोड (२७), कल्लूबाई विठ्ठल राठोड (३५), प्रियंका कल्लू राठोड (१८), तन्वीर किरण राठोड, (२), विठ्ठल खिरू राठोड (४०), संगीता किरण राठोड (२६, सर्व रा. मदभाई तांडा), देवानंद नारायण राठोड (३५, हिटनळी तांडा), अर्जुन रमेश चव्हाण (३०), श्रीकांत बासू राठोड (३८), सिनू बासू राठोड (३०, रा. कुडगी तांडा, ता. जि. विजापूर), माजीद मेहबूब आतार (२५), मेहबूब राजासाब आतार (५५ दोघे रा. खादी ग्रामोद्योक पाठीमागे, आलिका रोजा, विजापूर)