दहा टक्के कॉल्स खरी माहिती देणारे
By Admin | Published: January 5, 2015 06:31 AM2015-01-05T06:31:27+5:302015-01-05T06:31:27+5:30
पोलिसांच्या हेल्पलाइनचा फोन खणखणतो़़़ कोणीतरी अडचणीत असल्याने हा अॅलर्ट आहे, याच भावनेने पोलीस फोन उचलतात.
मुंबई : पोलिसांच्या हेल्पलाइनचा फोन खणखणतो़़़ कोणीतरी अडचणीत असल्याने हा अॅलर्ट आहे, याच भावनेने पोलीस फोन उचलतात. पण समोरून हॅलो... हॅलो़़़ इतकाच आवाज येतो आणि बहुतांश फोन हे अवघ्या ० ते ९ सेकंदांत कट होतात. दिवसभरात येणाऱ्या ५० टक्के कॉल्सच्या बाबतीत हेच घडताना दिसते. १०० आणि १०३ या हेल्पलाइन क्रमांकांवर येणाऱ्या कॉल्सपैकी फक्त १० टक्केच खरे असतात, अशी माहिती पोलीस दलाचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
पोलिसांची तत्काळ मदत मिळावी, यासाठी १०० हा हेल्पलाइन क्रमांक आहे. १०३ हा क्रमांक लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या छळासंदर्भातील माहिती, मदत देण्यासाठी आहे. या हेल्पलाइनवर कॉल आल्यावर पोलीस फोन करणाऱ्या व्यक्तीकडून सर्व माहिती घेतात आणि त्या भागात पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलिसांच्या टीमला ती माहिती दिली जाते. प्रत्यक्षात दिवसभरात येणाऱ्या कॉल्सपैकी १,१०० ते १,५०० कॉल्सना खऱ्या मदतीची गरज असल्याचे दिसून आले आहे.
१०० आणि १०३ या हेल्पलाइनवर येणारे ४० टक्के कॉल्स हे वेगवेगळी माहिती विचारण्यासाठी केले जातात. काही वेळा बेस्ट बसेसचीही चौकशी केली जाते. विमा योजनांविषयीही विचारले जाते़ एखाद्या ठिकाणी कसे पोहोचायचे, असे प्रश्नही विचारले जातात. तर अनेकदा ज्येष्ठ नागरिक १०३ या क्रमांकावर कॉल्स करून बोलतात़ नंतर थोड्या वेळाने फोन ठेवतो, असे सांगतात. फोन का केला, असे विचारल्यास बोलायला कोणी नाही म्हणून फोन केला, असे सांगितले जाते. पण ज्यासाठी हेल्पलाइन आहे त्यासाठी येणारे कॉल्स खूपच कमी असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)