दस-याला शिवसेनेचा सत्तात्याग?, फडणवीस सरकारवर मात्र परिणामाची शक्यता धूसरच
By यदू जोशी | Published: September 21, 2017 06:26 AM2017-09-21T06:26:41+5:302017-09-21T11:26:16+5:30
शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आदी प्रश्नांच्या निमित्ताने, शिवसेना राज्य सरकारमधून लवकरच बाहेर पडेल आणि त्यासंबंधीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात करतील, अशी माहिती आहे.
मुंबई : शेतकरी आत्महत्या, फसवी कर्जमाफी आदी प्रश्नांच्या निमित्ताने, शिवसेना राज्य सरकारमधून लवकरच बाहेर पडेल आणि त्यासंबंधीची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात करतील, अशी माहिती आहे. शिवसेनेच्या आमदार, खासदारांची दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर बैठक झाल्यानंतर, काही नेत्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. त्यातही सरकारमधून बाहेर पडण्याचाच मूड होता. मात्र, अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
खा. गजानन कीर्तिकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, माजी मंत्री लीलाधर डाके, खा. संजय राऊत या वेळी उपस्थित होते, असे समजते.
सरकारमधून बाहेर पडा, असा सेनेच्या बहुतांशी आमदारांचा आग्रह आहे. आताच निर्णय घेतल्यास, सरकारविरोधी वातावरण अधिक पेटविता येईल, त्याचा निवडणुकीत फायदा होईल. त्यामुळे जो निर्णय घ्यायचा, तो आताच घ्या, असे नेत्यांनी व आमदारांनी उद्धव यांना स्पष्टपणे सांगितले. आमदारांची मते व भाजपासोबतची फरफट थांबविण्यासाठी इच्छा बघता, सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेण्याच्या निर्णयापर्यंत उद्धव आले असल्याचे संकेत आहेत. पेट्रोल दरवाढ, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गावरूनही उद्धव हे त्या वेळी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल करतील, असे मानले जात आहे.
शिवसेनेने पाठिंबा काढला, तरी सरकार कोसळण्याची शक्यता नसून, १२२ आमदारांच्या साह्याने फडणवीस बहुमत सिद्ध करू शकतील. काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आले, तरच नवे सरकार बनेल, पण तशी शक्यता नाही. पाठिंबा काढल्यानंतर इतरांबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा शिवसेनेचा विचार नाही. विरोधी पक्षात राहून निवडणुकीला सामोरे गेल्यास फायदा होईल, असा प्रवाह सेनेत आहे.
>निवडणूक नको असल्याने सरकार तरेल
बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचे संख्याबळ लागेल, म्हणजे भाजपाला २३ आमदारांची गरज भासेल. तथापि, काँग्रेस, राष्ट्रवादी वा शिवसेनेपैकी कोणालाच आता निवडणूक नको असल्याने, कोणीही आताच सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही. अशा स्थितीत उपस्थित सदस्य संख्येच्या निम्म्याहून एक जास्त सदस्य असला, तरी सरकार टिकेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी घटस्थापनेच्या दिवशी पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे नुकतेच जाहीर केले होते. त्यामुळे आता राणे गुरुवारी काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे.
>शिवसेनेची साथ घेतल्यास काँग्रेसला मुस्लिमांची मते गमवावी लागू शकतात. त्यामुळे भाजपाविरुद्ध सर्व पक्ष एकत्र येणारच नाहीत, याचा अंदाज असल्यानेच, ‘त्यांनी अल्टिमेटम दिलेला असला, तरी ‘अल्टिमेट’ आम्हीच आहोत,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने बोलून दाखवित आहेत, असे राजकीय जाणकारांना वाटत आहे.
> पक्षीय बलाबल
भाजपा १२२
शिवसेना ६३
काँग्रेस ४२
राष्ट्रवादी ४१
बविआ ०३
शेकाप ०३
एमआयएम ०२
अपक्ष ०७
(भारिपा, माकपा, मनसे,
रासपा, सपा प्रत्येकी एक)