औदुंबरच्या गोशाळेत दहा हजार इको फ्रेंडली गणेशमूर्ती
By Admin | Published: June 11, 2017 06:21 PM2017-06-11T18:21:28+5:302017-06-11T18:21:28+5:30
औदुंबर (ता. पलूस) येथील गोपालनंदन गो शाळेमधून यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या इको फ्रेंडली
शरद जाधव/ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 11 - औदुंबर (ता. पलूस) येथील गोपालनंदन गो शाळेमधून यंदाच्या गणेशोत्सवासाठी देशी गाईच्या शेणापासून बनविलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे वितरण केले जाणार आहे. या दहा हजारांवर गणेशमूर्ती गुजरातमधून आणण्यात आल्याची माहिती गोपालनंदन गोशाळेचे प्रमुख सुहास पाटील यांनी दिली.
पर्यावरण रक्षणाबरोबरच, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि गाई वाचविण्यासाठी टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्याय म्हणून शाडूच्या किंवा मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात; पण यासाठी उपलब्ध साधनसामग्री, बनविण्यासाठी लागणारा वेळ व येणार खर्च, या सर्व बाबी कलाकार आणि भाविकांना न परवडणाऱ्या आहेत. मात्र या सर्वांना एक चांगला पर्याय शोधला आहे, तो गुजरात राज्यातील देवीमाँ गोमाई ग्रामीण महिला उद्योग, कियाडा (जि. राजकोट) या संस्थेने.
भारतीय वंशाच्या देशी गाईच्या शेणाचा वापर करून मोठ्या कल्पकतेने गणेश मूर्ती बनविल्या आहेत. वजनाला हलक्या, सहज हाताळता येतील अशा व आपणास पाहिजे तशा रंगविता येतील, अशा मूर्ती बनविल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
तीन इंचापासून तीन फुटापर्यंत विविध आकारात या मूर्ती तयार केल्या असून, विसर्जन केल्यानंतर त्या लगेचच विरघळतात. गाईचे शेण पाण्यात विरघळल्यानंतर पाणी स्वच्छ करीत असल्याने जलप्रदूषणही होणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. गोसेवा म्हणून नाममात्र मूल्य आकारून या इकोफ्रेंडली गणेश मूर्तींचे राज्यभर वितरण करण्यात येणार आहे. गेली पाच वर्षे हा प्रयोग सुरू असून, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकर आदींसह विविध मान्यवरांना या मूर्ती भेट दिल्या असून, त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
गोबर क्रांतीमुळे गार्इंचे पालनपोषण शक्य
भाकड गार्इंचे पालनपोषण करणे शेतकऱ्यांना परवडत नाही, म्हणून गार्इंची रवानगी नाईलाजास्तव कत्तलखान्यात केली जाते. गुजरातमध्ये गाईचे शेण पन्नास रुपये प्रतिकिलो दराने विकत घेऊन इको फ्रेंडली गणेशमूर्ती घडविल्या जातात. भविष्यात विविध शोभेच्या वस्तू बनवून देशभर त्या वितरित करण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतकरी व महिला बचतगटांना आर्थिक फायदा मिळेलच, शिवाय दुधापेक्षाही शेणाला दर मिळाल्याने गार्इंचा सांभाळही होईल.
- सुहास पाटील
गोपालनंदन गोशाळा