आणीबाणीतील मिसाबंदींना १० हजार पेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 06:54 AM2018-06-14T06:54:46+5:302018-06-14T06:54:46+5:30
आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या (मिसाबंदी) लढा देणाऱ्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.
मुंबई : आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या (मिसाबंदी) लढा देणाऱ्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.
याबाबत धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक आज महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट उपस्थित होते.
या बैठकीतील निर्णयानुसार, एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार, व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येतील.एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना मासिक पाच हजार व त्यांच्या पश्चात पत्नीस अडीच हजार पेन्शन मिळेल. या योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल.