दहा हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू; जाहिरात निघाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:24 AM2019-03-01T05:24:53+5:302019-03-01T05:24:57+5:30
राज्यातील सुमारे ५००० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याने रिक्त जागांची संख्या कमी झाली आहे.
मुंबई : शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात १०,००१ जागा भरण्यासंदर्भात पवित्र वेब पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
राज्यातील सुमारे ५००० अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याने रिक्त जागांची संख्या कमी झाली आहे. सामावून घ्यावयाचे अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षण सेवकांमधून स्थायी होणारे शिक्षक हे या भरतीमध्ये गृहीत धरलेले नाहीत. ही पूर्णत: नवीन दहा हजार शिक्षकांची भरती असेल. १६ जिल्ह्यांतील बिंदुनामावलीनंतर एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी एकही जागा दिसत नाही. त्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदुनामावलीची फेरतपासणी करून त्या जागा भरल्या जातील, तोपर्यंत तेथील ५० टक्के जागा भरल्या जातील.
पवित्र पोर्टलवरील जाहिरात सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांसाठी आहे. २ मार्चनंतर ही जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध होईल आणि ती पवित्र पोर्टलवर उमेदवारांनाही पाहायला मिळणार आहे.
संवर्ग व उपलब्ध जागा : अनुसूचित जाती - १,७०४, अनुसूचित जमाती - २,१४७, अनुसूचित जमाती (पेसा) - ५२५, व्ही.जे.ए. - ४०७, एन.टी.बी.- २४०, एन.टी.सी - २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव - १, ७१२, इ.डब्ल्यू. एस - ५४०, एस.बी.सी. - २०९, एस.ई.बी. सी. - १,१५४, सर्वसाधारण - ९२४