चिमणी संवर्धनाचे एक तप : 14 हजार घरट्यांचे मोफत वाटप

By Admin | Published: March 1, 2017 09:21 AM2017-03-01T09:21:04+5:302017-03-02T09:02:24+5:30

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत नाशिक, दि. 1 - लहानपणापासूनच निसर्गाविषयीची असलेली आवड आणि या आवडीतूनच वृक्ष, पक्षी, प्राण्यांची ...

A tenancy of sparrow culture: Free distribution of 14 thousand nests | चिमणी संवर्धनाचे एक तप : 14 हजार घरट्यांचे मोफत वाटप

चिमणी संवर्धनाचे एक तप : 14 हजार घरट्यांचे मोफत वाटप

Next

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत

नाशिक, दि. 1 - लहानपणापासूनच निसर्गाविषयीची असलेली आवड आणि या आवडीतूनच वृक्ष, पक्षी, प्राण्यांची लागलेली गोडी. निसर्गासाठी काहीतरी योगदान देण्याचे ध्येय घेऊन नाशिकमधील पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड हे मागील एक तपापासून चिमणी संवर्धनासाठी शहरात विशेष परिश्रम घेत आहेत. टाकाऊ फर्निचरच्या तुकड्यांपासून तयार केलेले १४ हजार कृत्रिम घरट्यांचे मोफत वाटप केले आहे. त्यांचा कृत्रिम घरटी वाटपाचे अभियान आजही सुरू आहे.


निसर्ग संवर्धनाचा घेतलेला वसा यशस्वीपणे पार पाडण्याची खुणगाठ गायकवाड यांनी बांधली. आपल्या अंगणातून उडून गेलेल्या चिमण्या पुन्हा कशा अंगणात परततील या चिंंतेतून मंथन करीत सुचलेल्या संकल्पनेतून त्यांनी एक प्रयोग करण्याचे ठरविले. गायकवाड यांनी आपले मित्र, नातेवाईक यांना फर्निचरच्या कामातून निघालेले टाकाऊ तुकडे फेकून न देता किंवा जाळून न टाकता दान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद लाभला.

मिळणाऱ्या फर्निचरच्या तुकड्यांपासून त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने लाकडी घरटी तयार करण्यास सुरूवात केली. प्रारंभी दहा ते पंधरा घरटी तयार करुन त्यांनी स्वत:च्या ‘संस्कृती’ अपार्टमेंटमध्ये सुरक्षितरीत्या टांगली. त्यानंतर राहत्या सदनिकेच्या खिडक्यांपासून तर बाल्कनीपर्यंत एकूण वीस घरटी त्यांनी लावली. एकूण चाळीस ते पन्नास घरटी त्यांनी अपार्टमेंटच्या परिसरात लावली. या घरट्यांचे दररोज निरीक्षण क रण्यास सुरूवात केली. सुरूवातीला चार ते पाच दिवस एकही चिमणीचे कुटुंब या कृत्रिम घरट्यांकडे फिरकले नाही; मात्र आठवडाभरातच ‘संस्कृती’च्या आवारातील घरट्यांमध्ये चिऊतार्इंनी संसार थाटण्यास सुरूवात केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि प्रयोग यशस्वी झाल्याच्या त्यांच्या आनंदापुढे जणू आकाश ठेंगणे झाले होते. त्यांच्या फ्लॅटच्या खिडक्यांमध्ये लावलेल्या घरट्यांमध्येही चिऊतार्इंनी वास्तव्यास सुरूवात केल्याने चिऊतार्इंचा चिवचिवाट ‘संस्कृती’मध्ये गुंजला.

कृत्रिम घरटी चिऊताई स्वीकारते हे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी मोफत कृत्रिम घरटी वाटप करण्याचे ठरविले. कारण विविध दुकानांमध्ये मिळणारे ‘बर्ड फिडर अ‍ॅण्ड बर्ड हाउस’च्या किमती अधिक असल्यामुळे नागरिक ते घेण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना, मित्रपरिवाराला भेट म्हणून चिमणी घरटे देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर शहरातील विविध संस्था, संघटना, फे्रे न्ड सर्कललादेखील चिमण्यांची घरटी मोफत वाटली. चिमणी संवर्धन व्हावे, हा एकमेव उद्देश त्यांचा यामागे होता. घरटी लावायची कशी याची सूचना व भ्रमणध्वनी क्रमांक असलेले स्टिकर त्यांनी प्रत्येक घरट्यावर चिकटवून ती घरटी वाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्यांच्या घरात घरट्यांमध्ये चिऊताई आली त्यांचा ‘कॉल’ गायकवाड यांना हमखास येतो. त्यांच्या आनंदपूर्ण संवाद ऐकून त्यांना जणू एकप्रकारे ऊर्जा मिळत गेली. हळूहळू नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडे फर्निचरचे तुकडे आणून देऊ लागले. यामुळे त्यांना कारपेंटरची मदत घ्यावी लागली आणि घरटी तयार करण्याचे प्रमाण वाढविले. बारा वर्षांमध्ये त्यांनी जवळपास १४ हजार घरटी वाटप केले आहेत.


तरूणाईचे संघटन... सोळा हजार रोपांचे संवर्धन
सर्वप्रथम शहरात चिमण्यांसाठी घरटी तयार करुन ती मोफत वाटणे व सकाळच्या सुमारास चारचाकी ट्रॉलीवर पाण्याने भरलेले डबे व काही रोपटे घेऊन मोकळ्या जागेवर वृक्षारोपणासाठी जाण्याचा दैनंदिन उपक्रम गायकवाड यांनी हाती घेतला. त्यांच्या या वृक्षप्रेमापोटी सकाळी स्वत:चे आरोग्य सुदृढ रहावे म्हणून फेरफटका मारणाऱ्या नाशिककरांचे लक्ष वेधले गेले. आपण आपल्या आरोग्यासाठी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करतो, मात्र हा अवलिया संपूर्ण शहराच्या पर्यावरणाचे आरोग्य सक्षम ठेवण्याचा विचार करत वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी झटतो आहे, हे नाशिककरांच्या लक्षात आले. ‘मै तो अकेला ही चला था जानिबे मंजील, मगर लोग साथ जुडते गयें और कारवां बनता गया...’ या शायरीप्रमाणे गायकवाड यांच्यासोबतही काही तरूणांसह मध्यमवयाच्या महिला, पुरूषही आले.

 

‘आता एकच चळवळ करुया वृक्षसंवर्धन’ असा नारा या निसर्गप्रेमींच्या ग्रुपने बुलंद केला. वृक्षारोपण करुन लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याचे व्रत त्यांच्या ‘आपलं पर्यावरण ग्रुप’ने घेतले आहे. नाशिकमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचा घेतलेला वसा प्रामाणिकपणे गायकवाड यांनी स्थापन केलेल्या आपलं पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. गायकवाड यांनी सलग दोन वर्षे शहरात लोकसहभागातून पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर ‘वनमहोत्सव’ घेऊन पहिल्या टप्प्यात अकरा हजार, तर दुसऱ्या टप्प्यात साडेपाच हजार रोपांची लागवड केली. केवळ वृक्षारोपण न करता किमान तीन वर्षे रोपट्यांच्या संवर्धनाच्या माध्यमातून पालकत्व या संस्थेच्या हरित सैनिकांनी घेतली आहे. २०१५ साली नाशिककरांनी लावलेल्या अकरा हजार रोपट्यांचे रूपांतर वृक्षांमध्ये होत असल्याचे ‘देवराई’वर बघून नागरिकांना मनस्वी आनंद होत आहे.

https://www.dailymotion.com/video/x844t3o

Web Title: A tenancy of sparrow culture: Free distribution of 14 thousand nests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.