भाडेकरूनेच केली मालकिणींची हत्या
By admin | Published: June 25, 2016 01:42 AM2016-06-25T01:42:09+5:302016-06-25T01:42:09+5:30
कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील दूधकर निवासमधील दोन वयोवृद्ध महिलांची त्यांच्याच भाडेकरूने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील दूधकर निवासमधील दोन वयोवृद्ध महिलांची त्यांच्याच भाडेकरूने हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नंदकुमार प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. त्याला कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने हत्याकांडानंतर अवघ्या सहा दिवसांत बिहारमध्ये सापळा रचून अटक केली आहे. दरम्यान, त्याला शनिवारी कल्याण येथे आणण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खडेगोळवली परिसरातील गावदेवी मंदिरानजीक असलेल्या दूधकर निवास येथे राहणाऱ्या लीलाबाई दूधकर (६०) व कमलाबाई दूधकर (७०) या नणंद-भावजयांची शनिवारी रात्री डोक्यात काठीने प्रहार करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर घरातील दोन कॅमेरे, सात तोळे दागिने व १० हजार रुपये घेऊन मारेकरी पसार झाला होता. कोळसेवाडी पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
घटनास्थळी पाहणी केली असता, ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा पोलिसांचा संशय होता. त्याचबरोबर दूधकर यांचा भाडेकरू प्रसाद बेपत्ता झाला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त करत त्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यासाठी कोळसेवाडी पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडेकर यांच्या पथकाने माग काढत बिहार राज्यातील सुलतानपूर गावात सापळा रचून त्याला अटक केली.
दूधकर नणंद-भावजय यांची आर्थिक परिस्थिती प्रसाद याला माहीत होती. या दोघींच्या घरात दागिने, पैसा अडका मिळेल, अशी आशा त्याला होती. त्यासाठी त्याने त्यांची हत्या करून चोरी करण्याचा कट रचला. शनिवारच्या पहाटे यातील एक महिला शौचास बाहेर गेली असताना त्याने घरातील महिलेच्या डोक्यात काठीने प्रहार केला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शौचावरून आलेल्या दुसऱ्या महिलेलाही त्याच पद्धतीने ठार मारले. घरातील किमती ऐवज घेऊन तेथून नंदकुमार पसार झाला होता.