बीपीटीच्या जागेवरील भाडेकरूंची निदर्शने
By admin | Published: April 5, 2017 02:41 AM2017-04-05T02:41:06+5:302017-04-05T02:41:06+5:30
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस दिल्याविरोधात शेकडो भाडेकरूंनी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली
मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस दिल्याविरोधात शेकडो भाडेकरूंनी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली. मुंबई पोर्ट ट्रस्टने कारवाईला स्थगिती देऊन राज्य शासनाने भाडेकरूंना दिलासा द्यावा, अशी मागणी संबंधित भाडेकरूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
भाडे नियंत्रण कायद्याच्या आधारे बीपीटी, एलआयसी आणि इतर सहकारी क्षेत्रीय संस्थांच्या जमिनीवरील भाडेकरूंना त्रास दिला जात असल्याचा आरोप सुबोध सप्रे यांनी केला. सप्रे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत संबंधित प्रशासने भाडेकरूंना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावत आहेत. याआधीच सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली भाडेकरू आणि प्रशासनाला तडजोडीचे सूत्र सांगितलेले आहे. या सूत्रानुसार २ हजार ३०० भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे. या सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे ४०० भाडेकरूंनी याआधीच ठरलेली रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे. मात्र तरीही गेल्या १० वर्षांत केवळ ६ भाडेकरूंनाच प्रशासनाने दिलासा दिलेला आहे. त्यामुळे संबंधित जागेवरून भाडेकरूंना हाकलून देण्याचा प्रशासनाचा डाव दिसत असल्याचा आरोपही सप्रे यांनी
केला.
याआधी काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा असताना भाडेकरू आणि प्रशासनामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत होते. काही ठिकाणी तर पोलीस बलाचा वापर करून भाडेकरूंना बळजबरीने घरे खाली करण्यास सरकारने भाग पडल्याचा आरोप माजी नगरसेवक विनोद शेखर यांनी केला. (प्रतिनिधी)