निविदा प्रक्रिया होणार पारदर्शक

By admin | Published: October 3, 2016 02:09 AM2016-10-03T02:09:56+5:302016-10-03T02:09:56+5:30

पक्षांच्या एकमेकांवर झालेल्या कुरघोड्या, अशी काहीशी नामुष्की ओढवलेल्या महापालिकेने आता निविदा प्रक्रियांमध्ये गुणात्मकता, पारदर्शकता व स्पर्धात्मकता वाढावी, यासाठी पुढाकार घेतला

Tender process will be transparent | निविदा प्रक्रिया होणार पारदर्शक

निविदा प्रक्रिया होणार पारदर्शक

Next


मुंबई : रस्त्यांसह नालेसफाईच्या कामात झालेल्या घोटाळ्याचे निमित्त साधत, विरोधकांनी-सत्ताधाऱ्यांनी डागलेली तोफ, रस्ते घोटाळ्याप्रकरणी महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना झालेली अटक, बड्या कंत्राटदारांना मिळालेले अभय आणि राजकीय पक्षांच्या एकमेकांवर झालेल्या कुरघोड्या, अशी काहीशी नामुष्की ओढवलेल्या महापालिकेने आता निविदा प्रक्रियांमध्ये गुणात्मकता, पारदर्शकता व स्पर्धात्मकता वाढावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंत्राटदारांसाठी ‘वातावरण टाइट’ केल्याने, राजकीय वरदस्त असणाऱ्या बड्या आणि ‘घोटाळे बहाद्दर’ कंत्राटदारांची चांगलीच गोची होणार आहे.
महापालिकेशी संबंधित विविध कामांच्या निविदा प्रक्रियेमध्ये गुणात्मकता, पारदर्शकता व स्पर्धात्मकता वाढावी आणि जास्तीत जास्त कंत्राटदार यामध्ये सहभागी व्हावे, या उद्देशाने आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशानुसार, उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांच्या अध्यक्षतेत तांत्रिक समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेला अहवाल व शिफारशी यावर नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या.
त्यानुसार, निविदा प्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आलेल्या ‘कराराच्या सर्वसाधारण प्रमाण अटी’ व ‘प्रमाण निविदा प्रपत्र’ येत्या १५ आॅक्टोबरपासून लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या सर्व प्रकारच्या निविदांची दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. या अंतर्गत कामाच्या स्वरूपानुसार नेहमीची कामे व विशेष कामे असे दोन भाग करण्यात आले असून, त्यानुरूप अधिकारांची निश्चिती करण्यात आली आहे.
निविदा प्रक्रियेसाठी कराराच्या सर्वसाधारण प्रमाण अटी निर्धारित करण्यात आल्या आहेत, तसेच महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारे प्रमाण निविदा प्रपत्र आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व निविदा प्रक्रियांसाठी एकाच प्रकारचे प्रमाण निविदा प्रपत्र उपयोगात आणले जाणार आहे.
महापालिकेच्या सर्व प्रकारच्या निविदांसाठी किमान अटी व निविदा प्रपत्र यांचे समानीकरण व सुलभीकरण करण्यात आल्याने, महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता व स्पर्धात्मकता जपण्यास मदत होणार आहे. याबाबत बांधकामांविषयीच्या निविदांबाबत लागू करण्यात आलेल्या सुधारित प्रमाण अटी आणि प्रमाण निविदा प्रपत्र याबाबतचे परिपत्रक महापालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
>निविदा प्रक्रियांसाठीचा कालावधी ५ वर्षे
महापालिकेने कंत्राटदारांकडून करवून घेतलेल्या कामांबाबत, या पूर्वी दोष दायित्व कालावधी हा वेगवेगळा असायचा. मात्र, आता यात बदल करण्यत आला असून, महापालिकेच्या सर्व निविदा प्रक्रियांसाठी हा कालावधी आता ५ वर्षे इतका असणार आहे.
>नामनिर्देशित अधिकाऱ्याची नियुक्ती
कंत्राटदाराच्या तक्रारी वा हरकती सोडवण्यासाठी नामनिर्देशित अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यानुसार, संबंधित खात्याचे विभागप्रमुख/प्रमुख अभियंता/अधिष्ठाता यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात संबंधित उपायुक्त/संचालक यांच्या स्तरावर प्रथम अपील करता येणार आहे. मात्र, प्रथम अपील स्तरावर समाधान न झाल्यास, त्यानंतरचे दुसरे अपील अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या स्तरावर करता येणार आहे.
>माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
महापालिकेच्या कामांमध्ये आता प्रथमच पृथ्वीवरील अक्षांश-रेखांश आधारित ‘जिओ टॅगिंग’सारख्या अत्याधुनिक प्रणालीचा अंतर्भाव करण्यात येत आहे. त्यामुळे ज्या कामाबाबत निविदा आहे, त्या कामापूर्वीची छायाचित्रे, काम सुरू असतानाची विविध स्तरावरील छायाचित्रे, तसेच काम पूर्ण झाल्यावरची छायाचित्रे ही या तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहेत, तसेच या छायाचित्रांसोबत संबंधित कामाचा दोष दायित्व कालावधी व संबंधित अर्थसंकल्पीय तरतूद याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कामामध्ये पारदर्शकता येण्यासोबतच कामाबाबत सनियंत्रण करणे सुलभ होणार आहे.
>स्पर्धा वाढणार
निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी या पूर्वी संबंधित कामासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री व यंत्रसामुग्री निविदाकाराकडे असणे बंधनकारक होते. मात्र, आता ही अट अधिक व्यापक करण्यात आली आहे. त्यानुसार, कामासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री व यंत्रसामुग्री काम प्राप्त झाल्यास उपलब्ध करून घेईन, अशी हमी देणारे कायदेशीर हमीपत्र निविदा अर्ज भरताना सोबत जोडणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे एखादी विशिष्ट यंत्रसामुग्री नसली, तरी निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे, ज्यामुळे निविदा विषयक स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे.
>नोंदणी रद्द करण्याची तरतूद
जो कंत्राटदार निविदाविषयक अटींचे उल्लंघन करेल, त्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याबाबत सुस्पष्ट मार्गदर्शक सूचनांचा अंतर्भाव सुधारित निविदा प्रक्रियेमध्ये आता करण्यात आला आहे. या अंतर्गत नोंदणी रद्द करण्याची तरतूद असण्यासोबतच, संबंधित कंत्राटदारास काही विशिष्ट कालावधीकरिता अथवा नेहमीकरिता प्रतिबंध लावण्यासारख्या कठोर बाबींचाही समावेश करण्यात आला आहे.
>कंत्राटदाराची
नोंद आवश्यक
निविदा भरण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्णपणे आॅनलाइन स्वरूपाची करण्यात येत आहे.
>नागरिकांनाही माहिती मिळणार
रस्त्याच्या कामाबाबत निविदा अर्ज मागविताना संबंधित रस्त्याची सद्यपरिस्थितीतील छायाचित्रे ‘जिओ टॅगिंग’ पद्धतीद्वारे महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केली जातील. त्यानंतर, सदर रस्त्याच्या कामासंबंधी प्रत्येक स्तराची छायाचित्रे व काम पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर अर्थसंकल्पीय तरतुदींच्या माहितीसह ‘जिओ टॅगिंग’सह उपलब्ध असतील. त्यामुळे महापालिकेच्या निविदाविषयक कामांची माहिती सर्व संबंधितांना, तसेच नागरिकांना सहजपणे उपलब्ध होईल.
अटी व शर्तींसाठी समान पद्धती
निविदा प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक व प्रतिसादात्मक व्हावी, यासाठी तांत्रिक व आर्थिक क्षमतेशी संबंधित अटी अधिक व्यापक करण्यात आल्या आहेत. या पूर्वी निविदेबाबत प्रत्येक विभागाच्या खात्याच्या अटी व शर्ती वेगवेगळ्या असायच्या. ही पद्धत आता बदलण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिकेच्या निविदा प्रक्रियेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती यांचे प्रमाणीकरण करण्यात आले असून, ते आता सर्व निविदांच्या बाबतीत समान पद्धतीने लागू असणार आहेत.

Web Title: Tender process will be transparent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.