पळशी झांशीच्या विकासासाठी तेंडुलकर यांचा पुढाकार!
By admin | Published: April 14, 2016 01:47 AM2016-04-14T01:47:00+5:302016-04-14T01:47:00+5:30
खासदार तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे.
संग्रामपूर (जि. बुलडाणा): संग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल पळशी झांशी या गावात रस्ते व सौर दिव्यांसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू व विक्रमवीर सचिन तेंडुलकर सरसावला आहे. खासदार तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. या मदतीसंदर्भात पत्र बुलडाणा जिल्हाधिकार्यांना ७ एप्रिल रोजी प्राप्त झाले आहे.
राज्यसभेच्या खासदारांना स्थानिक क्षेत्र विकास योजनेंतर्गत दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जातो. राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार हा निधी देशभरात कोठेही देऊ शकतात. त्यामुळेच पळशी झांशीचे सरपंच अरुण आबाराव मारोडे यांनी थेट सचिन तेंडुलकर यांना पत्र पाठवून गावातील रस्ते व सौर पथदिवे उभारणीसाठी निधीची मागणी करून गावाच्या विकासात योगदान देण्याची विनंती केली होती. खा. तेंडुलकर यांनी या पत्राची तत्काळ दखल घेत १0 लाखांचा निधी वितरित करण्याचा आदेश मुंबई उपनगर विभागाच्या जिल्हाधिकार्यांना दिला. या पत्राची प्रत बुलडाण्याच्या जिल्हाधिकार्यांना ७ एप्रिलला प्राप्त झाली. विशेष म्हणजे, हा निधी वितरित करण्यास अडचण असल्यास ७५ दिवसांच्या आत माहिती देण्यात यावी व सुचविलेल्या निधीतून सदर प्रकल्प पूर्ण होत नसेल, तर ४५ दिवसांच्या आत कळवावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. खा. तेंडुलकर यांच्या या मदतीच्या भूमिकेमुळे पळशी गावात आनंदाचे वातावरण आहे. पाच हजार लोकसंख्येच्या या गावामध्ये तेंडुलकरांनी दिलेल्या निधीतून रस्ते व सौर पथदिव्यांची कामे दज्रेदार होतील, अशी माहिती ग्रामसचिव हेमंत देशमुख यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.