लाखों रुपयांची कबुतरे गायब, त्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
By admin | Published: August 30, 2016 08:13 PM2016-08-30T20:13:06+5:302016-08-30T20:13:06+5:30
घरफोडी करणाऱ्या चोरांनी चक्क २ लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे हंगेरियन ढम्पे, टर, लाहोरी पक्ष्यांसह कबुतरे चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.
ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि.३० : घरफोडी करणाऱ्या चोरांनी चक्क २ लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे हंगेरियन ढम्पे, टर, लाहोरी पक्ष्यांसह कबुतरे चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता कबुतरे शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान ठाकले आहे.
तालुक्यातील कोनगावात राहणारा वैभव म्हात्रे (२२) या तरूणाला विविध रंगाच्या पक्ष्यांसह कबुतरे पाळण्याचा छंद आहे. हा तरूण विविध जातीचे पक्षी आणि रंगीबेरंगी कबुतरे आपल्या घराच्या छतावर ठेवून त्यांची देखभाल करीत असतो. मात्र शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या छतावरील कबुतरांसाठी लावलेली जाळी तोडून चोरट्यांनी आता प्रवेश केला आणि तेथून २ लाख ५० हजार रुपये किंमतीचे हंगेरियन ढम्पे, टर, लाहोरी पक्ष्यांसह १७ कबुतरे चोरून नेली. ही घटना समजल्यानंतर वैभव म्हात्रे यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन नांद्रे करीत आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील लोकांना समजल्यानंतर चर्चेचा विषय बनला आहे.