बालकाच्या मृत्यूनंतर तणाव
By admin | Published: July 4, 2016 04:30 AM2016-07-04T04:30:17+5:302016-07-04T04:30:17+5:30
रविवारी नातेवाइकांनी बालकाचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
परभणी : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत रविवारी नातेवाइकांनी बालकाचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळले.
संत गाडगेबाबानगर भागातील सिद्धार्थ सुरेश सदर या १४ महिन्यांच्या बालकाला ताप व झटके येत असल्याने शुक्रवारी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्याची प्रकृती अधिकच नाजूक झाली, असे नातेवाईकांचे म्हणणे होते. अशा स्थितीत या बालकास नांदेड येथे हलविण्यात आले. त्या ठिकाणी रविवारी त्याचा मृत्यू झाला.
या बालकाचा मृतदेह घेऊन नातेवाइकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. बालकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जावेद अथर यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. (प्रतिनिधी)