आंबेडकर भवन पाडल्याने तणाव
By Admin | Published: June 26, 2016 04:25 AM2016-06-26T04:25:46+5:302016-06-26T04:25:46+5:30
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यावरून शनिवारी दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला.
मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दादर येथील जुनी ऐतिहासिक प्रिटिंग प्रेस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यावरून शनिवारी दोन गटांत मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या भवनाची मालकी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टने पुनर्विकासासाठी पाडकाम केल्याचे सांगितले आहे. मात्र त्याला आंबेडकर कुटुंबीय व नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. आंबेडकर कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीनुसार याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणताही वाद उद्भवू नये, यासाठी आंबेडकर भवनाच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि पीपल्स इम्प्रूव्हमेंट या ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टची दादर पूर्वेकडील गोकूळदास पास्ता लेन परिसरातील डॉ. आंबेडकर भवन ही इमारत धोकादायक असल्याचे पालिकेने जाहीर केले. १ जून रोजी याबाबत नोटीसही बजाविण्यात आली. भवनातील सर्व बांधकामे नोटीस प्राप्त होताच ३० दिवसांच्या आत निष्कासित करणे संस्थेला बंधनकारक होते. शनिवारी पहाटे ३च्या सुमारास आंबेडकरी जनतेला थांगपत्ता लागू नये म्हणून या भवनावर बुलडोझर चढविण्यात आला. या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री बुलडोझर लावून येथे पाडकाम करण्यात आले. ही माहिती समजताच काही वेळातच घटनास्थळी समाजातील मंडळी मोठ्या संख्येने जमली. त्यांनी पाडकामाला विरोध दर्शवित संस्थेचा निषेध केला. घोषणाबाजीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त तरुणांनी निषेधार्थ परिसरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत भोईवाडा पोलीस ठाण्यात पाडकामाने भावना दुखावल्याचे सांगत तक्रार नोंदविण्यात आली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी दादरमध्ये परिसराला भेट देऊन घटनेचा निषेध केला आहे. (प्रतिनिधी)