डोंबिवलीत अर्बट क्राऊम केमीकल कंपनीत धूरामुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 06:59 PM2017-08-30T18:59:47+5:302017-08-30T19:00:13+5:30
एमआयडीसी फेज-२ मधील अर्बट क्राऊन या औषध बनवणाऱ्या केमीकल कंपनीमध्ये रसायनाचा पावसाच्या पाण्याशी संपर्क होऊन अचानक धूर झाल्याने कर्मचा-यांची एकच धावपळ झाली.
डोंबिवली, दि. 30 - येथील एमआयडीसी फेज-२ मधील अर्बट क्राऊन या औषध बनवणाऱ्या केमीकल कंपनीमध्ये रसायनाचा पावसाच्या पाण्याशी संपर्क होऊन अचानक धूर झाल्याने कर्मचा-यांची एकच धावपळ झाली. गतवर्षी २६ मे रोजी स्फोट झालेल्या प्रोबेस कंपनीच्या शेजारीच ही कंपनी आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
घटना घडली तेव्हा तेथे १५ कामगार कार्यरत होते, अनेक कामगार पावसामुळे कामावर आले नसल्याचे कंपनी कर्मचा-याने सांगितले. ही कंपनी औषधांच्या गोळया तयार करते. एसीडीक रेसीड नामक केमीकल पाण्याच्या संपर्कात आल्याने धूर झाल्याचे सांगण्यात आले. कंपनीत स्वच्छता करत कच्च्या मालाचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने अचानक धूर आल्याची माहिती मानपाडा पोलीसांनी दिली. घटनास्थळी अग्नीशमन दलासह प्रांताधिकारी प्रसाद उकर्डे यांच्यासह पोलीस अधिकारी नारायण देशमुख यांनी भेट दिली.
त्यांनीही वरील वृत्ताला दुजोरा देत दुर्घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले. या आधीही २ ऑगस्ट रोजी एमआयडीसीमधील इंडो अमाइन केमीकल कंपनीत ड्रमचा स्फोट झाल्याने तणाव झाला होता. ड्रम मधील केमिकलचा पावसाच्या पाण्याशी सम्पर्क होऊन तो ड्रममध्ये स्फोट झाला होता, त्या दुर्घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.