'सैराट' प्रेमावरून लातूरमधील 'तंटामुक्त' गावात वादाची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 11:55 AM2018-07-02T11:55:44+5:302018-07-02T11:57:51+5:30
तंटामुक्त गावात आता तणावपूर्ण शांतता
लातूर: दोन वर्षांपूर्वी आलेल्या सैराट चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. आर्ची आणि परशाच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण तिच्या कुटुंबीयांना लागताच गावात तणाव निर्माण होतो, असा प्रसंग सैराटमध्ये होता. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडीतही सध्या असाच तणाव निर्माण झाला आहे. सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला तंटामुक्त गाव म्हणून गौरवण्यात आलं होतं. मात्र एका सैराट प्रेम कहाणीमुळे गावातील शांतता भंग पावली आहे.
दलित समाजातील एका मुलाचे मराठा समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन रुद्रवाडीतील वातावरण बिघडलं. या प्रकरणात पोलिसांकडे एफआयआर दाखल झाला आहे. 9 मार्च रोजी मराठा समाजाच्या 20 हून अधिक जणांनी दलित तरुणावर हल्ला केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. या तरुणाला वाचवण्यास गेलेल्यांनाही मारहाण करण्यात आली, अशीही नोंद एफआयआरमध्ये आहे.
प्रेम संबंधाच्या संशयावरुन दलित तरुणावर हल्ला झाल्यानंतर आमच्यावरही अनेकदा हल्ले झाल्याचं सरपंच शालूभाई शिंदे यांचा मुलगा नितीन यांनी सांगितलं. 'आम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मात्र त्यावेळी कोणालाही अटक झाली नाही. तरुणावरील हल्ल्याच्या दोन दिवसानंतर काही लोक आमच्या घरात घुसले आणि काठ्यांनी आम्हाला मारहाण केली. त्याचवेळी आमच्या समाजाच्या एका मुलीचं लग्न सुरू होतं. आमच्या समाजातील काही लोक वधू-वरांसोबत मंदिरात गेले होते. आम्हाला त्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. आम्ही मंदिराच्या पायऱ्यांजवळूनच देवाला नमस्कार करतो. मात्र त्यादिवशी आम्हाला मंदिराच्या जवळही जाऊ देण्यात आलं नाही,' अशी माहिती नितीन यांनी दिली.
पोलिसांनी या प्रकरणात 22 जणांना अटक केली. यातील अनेकजण आता जामिनावर बाहेर आहेत. तक्रारकर्त्यांनी सामाजिक बहिष्काराची तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबद्दल मराठा समाजानं वेगळीच कहाणी सांगितली आहे. 'प्रेमसंबंधांमुळे काहीतरी वाद झाला होता. मात्र हा वाद काही लोकांपुरता मर्यादित आहे. दुसऱ्या समाजाचे लोक विनाकारण आमच्या पूर्ण समाजाला बदनाम करत आहेत,' असा आरोप हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या दत्तात्रय अतोलकर यांनी केला.