महाविकास आघाडीत खळबळ! उमेदवारीपासून वंचित नेता प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:30 PM2024-04-10T13:30:08+5:302024-04-10T13:59:22+5:30
Vishal Patil Sangli Latest News प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांना राज्यात अस्तित्व ठेवायचेच नाहीय असे वागत असल्याचा आरोप केला आहे.
सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा खेळ होणार आहे. आज स्थानिक काँग्रेस नेत्यांची बैठक होत आहे. अशातच सकाळीच नाराज काँग्रेस नेते विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील हे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत पाटलांच्या उमेदवारीबाबत घोषणा होणार आहे. अशातच वंचितनेही सांगलीत उमेदवारी कोणाला दिली नव्हती. यामुळे वंचितच्या पाठिंब्याने किंवा वंचितच्या तिकीटावर विशाल पाटील निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्राबल्य असलेला सांगली मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिला आहे. ठाकरेंनी उमेदवारीच्या वादावर आधीच उमेदवार जाहीर करून टाकल्याने काँग्रेसची पुरती कोंडी झाली होती. ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर विशाल पाटील हे तिथून इच्छुक आहेत. गेल्या ४० वर्षांपासून विशाल पाटलांचे घराणे या मतदारसंघात सत्ता राखून आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांना राज्यात अस्तित्व ठेवायचेच नाहीय असे वागत असल्याचा आरोप केला आहे. तसेच सांगलीत शिवसेनेची ताकद नसूनही त्यांना मतदारसंघ दिला गेल्याचे म्हटले आहे. पाटील आज सकाळीच मला भेटले. अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसेच मी त्यांना कोणता सल्लाही दिलेला नाही, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. वरिष्ठ नेतेही काही बोलायला तयार नाहीत. पटोले यांनी मी नाराज आहे परंतु हायकमांडचा आदेश मानावा लागेल असे म्हटले आहे. यामुळे काही केल्या स्थानिक नेतृत्व चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला जाण्याची शक्यता कमीच आहे. यातच विशाल पाटलांनी वेगळी भुमिका घेतली आणि उमेदवारी दाखल केली तर काँग्रेसची ताकद त्यांच्या मागे राहणार आहे. यामुळे ठाकरे-राऊतांना सांगलीचा अट्टाहास अन्य ठिकाणी देखील महागात पडण्याची शक्यता आहे.