आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 13:27 IST2025-01-20T13:26:37+5:302025-01-20T13:27:45+5:30
एक जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्री देण्यात आले. याचे पडसाद सर्वच मतदारसंघात उमटत आहे. शिवसैनिकांची नाराजी आहे असं थोरवे यांनी म्हटलं.

आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव?
कर्जत - राज्यातील पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीतील तणाव वाढला आहे. रायगड जिल्ह्याची पालकमंत्रिपदाची जबाबदारी आदिती तटकरेंना दिल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची लाट पसरली आहे. शिंदेंही नाराज असून ते दरे गावी गेल्याचं पुढे आले. आता यातच रायगडमधील कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही तटकरे यांच्या पालकमंत्रिपदाला विरोध करत आमचा राजकीय अस्त झाला तरी तटकरेंना स्वीकारणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जो उठाव झाला त्यात रायगडकरांचे फार योगदान आहे. भरतशेठ असतील, महेंद्र दळवी आणि मी सुद्धा उठावाला पाठिंबा दिला. जो काही अन्याय सुरू होता त्याला वाचा फोडण्याचं काम शिंदेंच्या नेतृत्वात केले. राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा संघटनेला बळ देण्यासाठी भरतशेठ यांनी मंत्रिपदाचा त्याग केला होता. त्यावेळी जर भरतशेठ मंत्री झाले असते तर तेव्हाच ते पालकमंत्री झाले असते. आता पुन्हा एकदा राज्यात बहुसंख्येने महायुतीचं सरकार आले. उठावाच्या परिवर्तनातूनच भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आली. भरतशेठ यांना मंत्री केले, आमची एकच मागणी होती मविआ सरकार उद्धव ठाकरे यांनी जो चुकीचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही शिंदेंच्या उठावाला पाठिंबा दिला असं त्यांनी सांगितले.
तसेच रायगडचं पालकमंत्री भरतशेठला मिळावे ही रायगडकरांची इच्छा होती. भाजपाचे ३, शिवसेनेचे ३ आमदार आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून आम्ही रायगडचे पालकमंत्री भरतशेठला करावे अशी मागणी केली होती. या नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता त्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलो त्याचा सातत्याने पाठपुरावा केला नाही. भरतशेठ मंत्री नव्हते तरीही रायगडचे पालकमंत्रिपद उदय सामंत यांच्यारुपाने शिवसेनेकडेच होते. त्यामुळे हे पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच राहावे हीच आमची मागणी होती. तरीसुद्धा एक जागा असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्री देण्यात आले. याचे पडसाद सर्वच मतदारसंघात उमटत आहे. शिवसैनिकांची नाराजी आहे. आम्ही वरिष्ठांना तात्काळ कळवलं. आम्ही प्रामाणिक काम करून महायुतीसोबत राहून असं राजकारण होत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आमचा राजकीय अस्त झाला तरी आम्ही तटकरे कुटुंबाला स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला.
दरम्यान, पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली ते चांगले झाले. विधानसभेची निवडणूक सगळ्यांनी पाहिली. महायुतीत असतानाही घटक पक्षाचे तिन्हीही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न झाला होता. असंतोष आमच्या मनात होता. शिवसेनेला पालकमंत्री पद मिळणार नसेल तर भाजपाला पालकमंत्रिपद देण्यासही आमची तयारी होती परंतु राष्ट्रवादीचा पालकमंत्री आम्ही कदापि स्वीकारणार नाही. महायुतीत राहून त्यांनी बेईमानी केली होती ती आम्हाला मान्य नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर बसून योग्य तो निर्णय घेतील याचा विश्वास आहे असं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं.