शिंदे-ठाकरे गटात तणाव; कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या पोस्टरवर अज्ञाताची शाईफेक
By आशपाक पठाण | Published: August 21, 2022 07:43 PM2022-08-21T19:43:29+5:302022-08-21T19:44:13+5:30
लातूर जिल्ह्यात शिवसैनिकांची सकाळपासून धरपकड
आशपाक पठाण
लातूर - राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औसा दौऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. यासह त्यांच्या स्वागतासाठी औसा टी पॉईंटवर पोस्टरवर अज्ञात इसमांनी शाई फेकल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, अहमदपूर, निलंगा, औसा आदी भागातील शिवसैनिकांनी पोलिसांनी सकाळपासूनच ताब्यात घेतले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार रविवारी लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून शिवसैनिकांना ताब्यात घेतले. औसा शहरासह तालुक्यातील जयनगर,एरंडी येथील गावांना भेट देवून पाहणी केली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी जागोजागी कृषीमंत्र्यांचा विरोध दर्शविला. औशात पोस्टरवर शाईफेक केल्याने वातावरण तापले. वेळीच पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष सोमवंशी यांना एरंडीत ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी विरोध दर्शवित राज्य सरकारचा निषेध करीत कृषी मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तालुका प्रमुख सतिष शिंदे, सुरेश भुरे,जयश्री उटगे, बाजार समितीचे उपमुख्य प्रशासक किशोर जाधव,संजय उजळंबे,श्रीधर साळुंके, गणेश जाधव, नवनाथ लवटे, सुरेश मुसळे, दिनेश जावळे, अजित सोमवंशी, सचिन पवार, श्रीराम कुलकर्णी, विलास लंगर, महेश लंगर, संतोष भोसले, राहुल भोसले, शंकर कोव्हाळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अज्ञाताचा शोध सुरू - पोलीस अधीक्षक निखील पिंगळे
दरम्यान, पोलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, शाई फेक करणार्याचा अज्ञाताचा पोलीस तपास करीत आहेत. यावेळी पोलीस उपाधीक्षक निकेतन कदम,उपविभागीय पोलिस अधिकारी मधूकर पवार,पोनि शंकर पटवारी, सपोनि. ज्ञानदेव सानप यांच्यासह मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्तात होते.
अहमदपूरमध्ये ६० शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना अटक
अहमदपूरमध्ये पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी लातूर जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांना त्यांच्या घरी जाऊन तर उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, उपतालुका प्रमुख अनिल लामतुरे, लहू बारवाड, विनोद वाघमारे, सुभाष गुंडिले, गणेश माने, ॲड. स्वप्नील व्हत्ते, शिवकुमार बेद्रे, सुमित कदम, शिवा भारती, देवानंद मुळे, निकेत हिवरे, श्याम गलाले ,नितीन मस्के,यांच्यासह ६० शिवसैनिक यांना ताब्यात घेतले.
निलंगा,कासार शिरशीमध्ये धरपकड
निलंगा येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, जगदीश लोभे, दत्ता मोहोळकर,महिला आघाडीच्या तालुका संघटक रेखाताई पुजारी, मुस्तफा शेख, सतीश फट्टे, रब्बानी सौदागर, राहुल बिरादार आदी शिवसैनिकांना रविवारी सकाळ पासूनच ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले आहे. कासार शिरशी भागातील किरण कानडे, मयूर गबुरे, अर्जुन नेलवाडे, जगन जगदाळे यांच्यासह अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले.