साताऱ्याजवळ सापडली दहाव्या शतकातील मराठी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2015 11:00 PM2015-06-28T23:00:51+5:302015-06-29T00:38:13+5:30

गायवासरू अन् ‘गधेगाळ’ एकाच शिलालेखावर

Tenth century Marathi found near Satara! | साताऱ्याजवळ सापडली दहाव्या शतकातील मराठी !

साताऱ्याजवळ सापडली दहाव्या शतकातील मराठी !

googlenewsNext

राजीव मुळ्ये - सातारा --मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ग्राह्य लिखित पुरावा ठरलेल्या अक्षी-अलिबाग येथील शिलालेखासारखाच दुसरा शिलालेख साताऱ्यापासून पंधरा किलोमीटरवरील कोरेगावात सापडला असून, त्यावरील संस्कृतमिश्रित मराठी अक्षीच्या समकालीन असू शकते, असा अंदाज आहे. गायवासरू आणि ‘गधेगाळ’ ही दोन चिन्हे एकाच शिलालेखावर आढळण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरल्याने या ऐतिहासिक ठेव्याचे मूल्य शतगुणित झाले आहे.
साताऱ्याच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर हे यश मिळविले असून, कोरेगावच्या केदारेश्वर मंदिराच्या परिसरात प्राचीन इतिहास दडला असल्याची खात्री संस्थेच्या सदस्यांना झाली होती. तीळगंगा नदीच्या काठावर हे मंदिर असून, त्याचे बांधकाम आणि जीर्णोद्धार अनेक टप्प्यांत झाला असावा हे त्याच्या स्थापत्यशैलीवरून लक्षात येते. याच ठिकाणचा एक शिलालेख निम्म्याहून अधिक जमिनीखाली गाडला गेला आहे, हे ‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे, नीलेश पंडित, सागर गायकवाड, योगेश चौकवाले, धैर्यशील पवार, शीतल दीक्षित यांना आढळून आले. श्री केदारेश्वर ट्रस्टच्या सहकार्याने या मंडळींनी गाडलेला भाग मोकळा केला. हा शिलालेख एकूण तेरा ओळींचा असून, देवनागरी आहे. यातील ‘ज’ या अक्षराचे वळण दहाव्या शतकातील आहे. ही संस्कृतमिश्रित मराठी असण्याची शक्यता असून, या शिलालेखाचे वाचन व अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठी ही अभिजात भाषा असल्याचे दाखवून देणारा सर्वांत जुना शिलालेख अक्षी-अलिबाग येथे आढळला असून, त्यावरही ‘गधेगाळ’ हे चिन्ह आहे. ते शापवाणीचे निदर्शक असून, ते शिलाहारकालीन चिन्ह आहे. कोरेगावातील शिलालेखाच्या तळातही अशाच प्रकारची ‘गधेगाळ’ सापडली असून, येथील अवशेषही शिलाहारकालीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, शिलालेखाच्या वरच्या बाजूला गायवासरू हे चिन्ह असून, तळाला ‘गधेगाळ’ चिन्ह आहे. ही चिन्हे एकाच शिळेवर आतापर्यंत कधीच सापडली नव्हती. त्या दृष्टीने या अनमोल ठेव्याचे जतन आणि त्यावर संशोधन व्हावे, अशी ‘जिज्ञासा’ची अपेक्षा आहे.
सौम्य-प्रखर चिन्हे एकत्र
ज्येष्ठ इतिहासकार वि. वा. मिराशी यांच्या मते, गाय ही जमिनीचे, तर वासरू हे भोगवटादाराचे प्रतीक आहे. दूध म्हणजे जमिनीचे उत्पन्न. जमीन देवस्थानला दान केली आहे. त्यावर अतिक्रमण होऊ नये, असा या चिन्हाचा अर्थ असून, हे सौम्य चिन्ह मानले जाते. तथापि, अतिक्रमणाची शक्यता अधिक असल्यास ‘गधेगाळ’ किंवा ‘गद्धेगाळ’ हे प्रखर चिन्ह वापरले जात असे.
‘गाळ’ हा मूळ कन्नड शब्द असून, त्याचा अर्थ शिळा किंवा पट असा आहे. अतिक्रमण करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळेल आणि तो आपल्या आईशी रत होईल, अशी ही शापवाणी आहे. गायवासरू आणि ‘गधेगाळ’ एकाच शिलालेखावर आढळल्याने संशोधकांच्या भुवया उंचावणार आहेत.



कोरेगाव येथील शिलालेखावर सौम्य आणि प्रखर अशी दोन राजाज्ञेची चिन्हे एकत्रित आढळली आहेत.



देशातील पहिलीच घटना
गायवासरू आणि ‘गधेगाळ’ ही दोन चिन्हे एकाच शिलालेखावर आढळण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरली आहे.


या संशोधनामुळे प्राचीन समाजरचना, कायद्यांची रचना आणि सामाजिक उलथापालथीचे आकलन होणार आहे. समकालीन शिलालेख अनेक कारणांनी वाचता येत नाहीत. त्या तुलनेत कोरेगावचा शिलालेख वाचता येण्याजोगा असून, राजाज्ञेचे एक चिन्ह असताना दुसरे का कोरले गेले, याचा अभ्यास केल्यास दहाव्या शतकातील घडामोडींवर प्रकाश पडू शकेल.
- नीलेश पंडित, इतिहास अभ्यासक

Web Title: Tenth century Marathi found near Satara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.