दहावीच्या परीक्षेचे अर्ज येत्या 16 आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 08:06 PM2017-10-12T20:06:09+5:302017-10-12T20:07:13+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेतल्या जाणा-या दहावीच्या परीक्षेचे अर्ज येत्या 16 आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2018 मध्ये घेतल्या जाणा-या दहावीच्या परीक्षेचे अर्ज येत्या 16 आॅक्टोबरपासून आॅनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी आपल्या शाळांशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे केले आहे.
विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून येत्या 16 आॅक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह दहावीच्या परीक्षेचे आॅनलाइन अर्ज भरता येतील. तसेच 7 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. आॅनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क माध्यमिक शाळांनी चलनाद्वारे बँकेत नियोजित कालावधीमध्येच जमा करावे. तसेच आॅनलाइन अर्ज भरताना अडचण आल्यास मुख्याध्यापकांनी संबंधित विभागीय मंडळांशी संपर्क साधावा.
शासन आदेशानुसार शाळांनी विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाणी आॅनलाइन अर्जात नमूद करण्याची कार्यवाही करावी. तसेच परीक्षा अर्जात आधारकार्ड नोंदणी क्रमांक नमूद करणे अनिवार्य केलेले आहे. परंतु एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नोंदणी केलेले असेल, तर नोंदणी क्रमांक ग्राह्य धरण्यात येईल. नोंदणी केलेली नसेल, तर निकालापर्यंत आधार कार्ड काढण्यात येईल, असे विद्यार्थ्यांकडून लेखी हमी पत्र घ्यावे. मात्र, आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याचा आॅनलाइन अर्ज नाकारू नये, असेही राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.