जन्मदाता पिताच्या मृत्यूनंतरही दु:खावर मात करून मुलीने दिला दहावीचा इंग्रजीचा पेपर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 03:05 AM2020-03-10T03:05:48+5:302020-03-10T07:01:59+5:30
लातूर जिल्ह्यात पेपर सुटल्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
औसा (जि. लातूर) : सोमवारचा दिवस उजाडला अन् रोंगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पहाटे नित्यनेमाने उठणाऱ्या पित्याचे काही क्षणातच निधन झाल्याने कुटुंबाला धक्का बसला. घरात आपल्या जन्मदात्याचा मृतदेह असताना सोमवारी शीतल रोंगे या मुलीने एकुर्का येथील परीक्षा केंद्रावर दहावी इंग्रजीचा पेपर दिला. पेपर सुटताच टाहो फोडत ती वडिलांच्या अंत्यदर्शनाला पोहोचली़ ही घटना औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथे घडली.
तुकाराम किसन रोंगे (५० रा. बोरगाव ता. औसा) हे शेळीपालनातून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह भागवायचे. कुटुंबात पाच मुली असून, दोन मुलींचे लग्न झाले आहे. घरात असलेल्या तीन मुलींचे शिक्षण आणि संसाराचा गाडा ते मोलमजुरी करुन हाकत होते. सोमवारी रोजच्याप्रमाणेच ते पहाटे ५.३० वाजता झोपेतून उठले. पत्नीशी संवाद साधला. मुलीचा इंग्रजीचा पेपर असल्याने त्यांनी मुलीशी बातचित केली. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चक्कर आल्याने ते अचनाक जमीनीवर कोसळले अन् त्यातच त्यांचे निधन झाले. इकडे अभ्यास करत बसलेल्या शितल आणि रोंगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. घरात जन्मदात्याचा मृतदेह असताना शितलने दु:ख पचवत सकाळी ११ वाजता एकुर्गा येथील छत्रपती शाहू विद्यालयाचे परीक्षा केंद्र गाठले. पित्याच्या निधनाचे दु:ख पचवत अन् अश्रू ढाळत शितलने दहावी इंग्रजीचा पेपर दिला.
नातेवाईक, गावकऱ्यांना आले गहिवरुन
परीक्षेनंतर घरी परतलेल्या शितलने पित्याचे अखेरचे दर्शन घेतल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. यावेळी उपस्थित नातेवाईक आणि गावकरी गहिवरुन गेले होते. शितल औसा तालुक्यातील भेटा येथील भारत विद्यालयात शिक्षण घेत आहे.