दहावीची परीक्षा - १५४ प्रश्नपत्रिका अपुऱ्या

By admin | Published: March 12, 2015 11:49 PM2015-03-12T23:49:34+5:302015-03-12T23:52:31+5:30

तीन केंद्रांवर छायांकित प्रती वाटण्याची नामुष्की

Tenth test - 154 question papers inadequate | दहावीची परीक्षा - १५४ प्रश्नपत्रिका अपुऱ्या

दहावीची परीक्षा - १५४ प्रश्नपत्रिका अपुऱ्या

Next

सावंतवाडी/कुडाळ : चिपळूण येथे दहावीच्या परीक्षेतील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला असतानाच तसाच प्रकार गुरुवारी सावंतवाडीतील चार, तसेच कुडाळ आणि कसाल येथील एका केंद्रावर घडला.
इंग्रजी माध्यमातील बहुसंच पद्धत ‘डी’ मधील भूमिती या विषयाच्या प्रश्नपत्रिका या सर्व केंद्रांवर कमी आल्या होत्या. त्यामुळे १५४ प्रश्नपत्रिका छायांकित करून वितरित करण्याची नामुष्की मंडळावर आली. कसालच्या एका केंद्रावर ६४ प्रश्नपत्रिका कमी पडल्या. आंबोली सैनिक स्कूलच्या केंद्रावर एक तास, अन्य केंद्रावर २0 मिनिटे उशिरा पेपर सुरू झाल्याने खळबळ उडाली.
गेल्याच आठवड्यात चिपळूण येथील माध्यमिक शालांत परीक्षेच्या केंद्रावर ४५० प्रश्नपत्रिका कमी आल्याने छायांकित प्रती वाटण्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. नेमका असाच प्रकार गुरुवारी सावंतवाडी, कुडाळ आणि कसाल येथील केंद्रांवर घडला. गुरुवारी भूमितीचा पेपर होता. त्यासाठी सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या कस्टडीत प्रश्नपत्रिका ठेवण्यात आल्या होत्या. त्या प्रश्नपत्रिकांचे वाटप पर्यवेक्षकांकडे होते. पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका केंद्रांवर घेऊन गेल्यावर अकरा वाजण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात दिल्या जातात. त्यावेळी सावंतवाडी तालुक्यातील चार केंद्रांवर व कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील एका केंद्रावर बहुसंच पद्धतीतील ‘डी’मधील काही प्रश्नपत्रिका कमी असल्याचे शिक्षकांना आढळून आले, तर मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका वाढल्या होत्या. याबाबत सावंतवाडी तालुक्याचे माध्यमिक शालांत परीक्षेचे मुख्य पर्यवेक्षक बी. आर. जगताप यांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला. त्यानंतर त्यांनी सर्व केंद्रांतून माहिती घेतली. यावेळी मिलाग्रीस हायस्कूल येथे २०, सांगेली हायस्कूल सांगेली येथे ९, मळगाव हायस्कूलमध्ये २१, आंबोली सैनिक स्कूल येथे ३०, तर माणगाव हायस्कूल माणगाव या शाळेत २० प्रश्नपत्रिका कमी पडल्या होत्या.
या प्रकारानंतर सावंतवाडी येथील एका झेरॉक्स सेंटरमध्ये पोलीस संरक्षणात ९० प्रश्नपत्रिकांच्या छायांकित प्रती काढण्यात आल्या व कमी पडलेल्या केंद्रांवर पाठविण्यात आल्या. त्यामुळे माणगाव, सांगेली, मळगाव केंद्रांवर २० मिनिटे, तर मिलाग्रीस हायस्कूलमध्ये दहा मिनिटे उशिरा परीक्षा सुरू करण्यात आली. आंबोली सैनिक स्कूलमध्ये तर तब्बल एक तास उशिरा परीक्षा सुरू करण्यात आली. (प्रतिनिधी)

कसाल केंद्रावर ६४ प्रश्नपत्रिका कमी
कुडाळ : कोकण बोर्डाचा सावळागोंधळ सुरू असून दहावी परीक्षेच्या कसाल केंद्रावर भूमितीचे ६४ पेपर कमी तर हळदिचे नेरूर येथे मराठी माध्यमाच्या मुलांना १० इंग्रजी माध्यमांचे भूमितीचे पेपर देण्यात आले. दरम्यान, केंद्रप्रमुख व इतर शिक्षकांची तारांबळ उडाली.
दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांना पेपर कमी येण्याचे प्रमाण वाढत आहे. बोर्डाच्या सावळा गोंधळाचा फटका आता जिल्'ातील विद्यार्थ्यांनाही बसू लागला आहे. गुरूवारी सकाळी ११ वाजता दहावीचा भूमितीचा पेपर होता. कसाल केंद्रावर विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी पेपरची सिलबंद पाकीटे फोडण्यात आली. परंतु ३८७ विद्यार्थ्यांना भूमिती पेपरऐवजी सर्व पेपर न येता ६४ पेपर कमी आले. तर हळदीचे नेरूर येथे ५५ विद्यार्थ्यांना १० इंग्रजी माध्यमांचे पेपर जादा आले. बी सेटचे इंग्रजी पेपर जास्त आले.
या प्रकारामुळे सर्व उपस्थित शिक्षक, केंद्रप्रमुखांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान, वरिष्ठांशी चर्चा करून तत्काळ जादा आलेल्या पेपरमधून या विद्यार्थ्यांना पेपर देण्यात आले. बोर्डाच्या या गोंधळामुळे मात्र विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

पोलीस बंदोबस्तात छायांकित प्रती
प्रश्नपत्रिका कमी आल्याने मुख्य पर्यवेक्षकांनी सावंतवाडीत छायांकित प्रती काढल्या. यावेळी झेरॉक्स सेंटर बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एखाद्या प्रश्नपत्रिकेची वाच्यता बाहेर होऊ नये, याची पूर्ण खबरदारी घेतली होती.

दहा टक्के वाढीव नाहीच उलट वीस टक्के कमी
उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक परीक्षेवेळी शिक्षण मंडळाच्या नियामानुसार प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या संचामध्ये विद्यार्थीवर्गापेक्षा दहा टक्केजास्त प्रश्नपत्रिका असणे गरजेचे असते; पण भूमिती विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या संचात दहा टक्केवाढीव नाहीच, उलट २० टक्के कमी प्रश्नपत्रिका असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यात पहिल्यांदाच घडला प्रकार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखाद्या प्रश्नपत्रिकेची छायांकित प्रत काढण्याची वेळ ही शालांत माध्यमिक मंडळावर प्रथमच आली. यापूर्वी कधीही असा प्रकार घडला नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.


सावंतवाडीत काही केंद्रांवर कमी पडलेल्या प्रश्नपत्रिक ांबाबत रत्नागिरीतील शालांत विभागाचे सचिव एस. गिरी यांना कल्पना देण्यात आली होती. त्यांनी आदेश दिल्यानंतरच छायांकित प्रती काढण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिका कमी आल्याचे आम्हाला पेपरच्या दिवशीच कळते. त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी आलेल्या केंद्रांवर त्या उशिरा देण्यात आल्या व विद्यार्थ्यांना तेवढा वेळ वाढवून देण्यात आल्या.
- बी. आर. जगताप, मुख्य पर्यवेक्षक ,माध्यमिक विभाग

Web Title: Tenth test - 154 question papers inadequate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.