दहावीची परीक्षा १ मार्च; तर बारावीची २१ फेब्रुवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:58 AM2017-11-30T04:58:27+5:302017-11-30T04:58:42+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील सूचना व हरकतींची दखल घेऊन दहावीच्या नवीन व्यवसाय विषयांचापेपर ५ मार्चऐवजी १७ मार्च रोजी होणार आहे.
पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील सूचना व हरकतींची दखल घेऊन दहावीच्या नवीन व्यवसाय विषयांचा पेपर ५ मार्चऐवजी १७ मार्च रोजी होणार आहे. सुधारित अंतिम वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्चदरम्यान घेतली जाईल, असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळांतर्गत फेब्रुवारी-मार्च २०१८मध्ये राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार असून, त्याचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर १८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर १५ दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. संभाव्य वेळापत्रकाबाबत लोकप्रतिनिधी, संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, सूचना, अभिप्राय यांचे अवलोकन करून बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. मात्र, दहावीच्या वेळापत्रकात ५ मार्च रोजीचा द्वितीय सत्रातील नवीन व्यवसाय विषयाचा पेपर १७ मार्च रोजी प्रथम सत्रात घेतला जाईल.
छापील वेळापत्रकच अंतिम
www.mahahsscboard.
maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक हे अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य यंत्रणेने छपाई केले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. त्याच प्रमाणे प्रत्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व कनिष्ठ महाविद्याल्यांना कळविण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.