आजपासून दहावीची परीक्षा

By admin | Published: March 7, 2017 02:13 AM2017-03-07T02:13:22+5:302017-03-07T02:13:22+5:30

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवार, ७ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Tenth test from today | आजपासून दहावीची परीक्षा

आजपासून दहावीची परीक्षा

Next

प्राची सोनवणे,
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला मंगळवार, ७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई विभागातील ३ लाख ८६ हजार ४८० विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. बारावीचे सलग तीन पेपर वेळेआधी व्हॉट्सअ‍ॅपवर आढळल्याने दहावीच्या परीक्षेला कॉपीमुक्त परीक्षेसाठी संवेदनशील केंद्रावर करडी नजर राहणार आहे.
११ ते २ या वेळेत होणाऱ्या परीक्षेला अर्धा तास आधी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार असून एक तास उशिराने पोहोचणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. उशिराने आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर होण्यामागचे नेमके कारण विचारून, त्याची स्वतंत्र नोंद केली जाणार आहे. या विद्यार्थ्याची माहिती बोर्डाला कळविली जाईल आणि त्यानंतर आलेल्या निर्णयानुसार केंद्रप्रमुख कार्यवाही करतील. परीक्षेकरिता भरारी पथके, केंद्रप्रमुख, डाएट प्राचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस सुरक्षा ठेवली जाणार आहे. मुंबई विभागातील ९७६ केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार असून ७१ परीरक्षण केंद्र सुसज्ज झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. परीक्षा केंद्रावरील सुरक्षेकरिता बोर्डाच्या विशेष भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. बोर्डाने दिलेल्या सूचनेनुसार परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी मोबाइल फोन जमा केले जाणार आहेत. पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांना देखील मोबाइल वापरण्यास बंदी असून केंद्रावर जाण्यापूर्वीच फोन जमा करून प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्राला भेट देणाऱ्या भरारी पथकाकडील सदस्यांचे ओळखपत्रही तपासले जाणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहे. ज्या अपंग विद्यार्थ्यांना कॅलक्युलेटरचा वापर करण्यास मान्यता मिळाली आहे त्या विद्यार्थ्यांनाच कॅलक्युलेटरचा वापर करता येणार आहे.
>अपंग विद्यार्थ्यांना
विशेष सोय
अंध, कर्णबधिर विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये याकरिता परीक्षा केंद्रावर विशेष व्यवस्था केली आहे. नवी मुंबईतील चौगुले सौरभ श्रीधर हा विद्यार्थी अंध तसेच कर्णबधिर असल्याने या विद्यार्थ्याकरिता संवादक तसेच लेखनिक यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा विद्यार्थी घणसोली येथील टिळक इंटरनॅशनल स्कूल या केंद्रावर परीक्षा देणार असल्याची माहिती बोर्डाने दिली.
बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअ‍ॅपवर आढळल्याप्रकरणी दोषींना ताब्यात घेतले आहे. दहावीच्या परीक्षेला बोर्डाची यंत्रणा सुसज्ज असून गैरप्रकार घडू नये याची विशेष दक्षता घेणार आहे. अपंग विद्यार्थ्यांकरिता विशेष सोय करण्यात आली असून या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्वतंत्र कस्टडीत जमा केल्या जाणार आहेत.
- दत्तात्रेय जगताप,
अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Web Title: Tenth test from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.