हार्बरवर शुक्रवारपासून बारा डबा लोकल !
By admin | Published: April 28, 2016 05:40 AM2016-04-28T05:40:20+5:302016-04-28T05:40:20+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर बारा डबा लोकल धावत असतानाच हार्बरवासीयांना मात्र त्यासाठी बरीच वर्ष प्रतीक्षा करावी लागली.
मुंबई : मध्य रेल्वे मेन लाइन तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर बारा डबा लोकल धावत असतानाच हार्बरवासीयांना मात्र त्यासाठी बरीच वर्ष प्रतीक्षा करावी लागली. ही प्रतीक्षा मध्य रेल्वेने संपुष्टात आणली असून २९ एप्रिलपासून बारा डबा लोकल धावणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरुवातीला एकच लोकल हार्बर मार्गावर धावेल.
हार्बरवरील १२ डबा लोकलचा प्रकल्प डिसेंबर २0१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु या प्रकल्पाला दीड वर्ष विलंब झाला. हार्बरवरील बारा डब्याचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे काम हे सीएसटी स्थानकात होते. ते काम ७२ तासांत पूर्ण करून हार्बरचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. तरीही वडाळा येथे मोटरमनला सिग्नल पाहण्यात होत असलेला अडथळा आणि डॉकयार्ड रोड स्थानकात प्लॅटफॉर्मची बाकी असलेली लांबी व उंची यामुळे काम आणखी रखडले होते. परंतु हे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन देत ते मार्गी लावण्यात आले. अखेर हार्बरवर बारा डबा लोकल २९ एप्रिलपासून सुरू करत असल्याची घोषणा मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी बुधवारी केली. सुरुवातीला एकच लोकल धावणार असून या लोकलच्या १४ फेऱ्या होतील. सीएसटी ते पनवेल, वाशी, वडाळा ते पनवेल, वाशी या मार्गावर ही लोकल धावेल. बारा डबा लोकलमुळे प्रवासी क्षमता ३३ टक्क्यांनी वाढेल. (प्रतिनिधी)