पाच सदस्यांचे पद रद्द
By admin | Published: June 10, 2016 01:45 AM2016-06-10T01:45:53+5:302016-06-10T01:45:53+5:30
मावळ तालुक्यातील वळक (पो. टाकवे खुर्द) ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे
वडगाव : ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने मावळ तालुक्यातील वळक (पो. टाकवे खुर्द) ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांचे पद रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ग्रामपंचायत शाखा अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी या संदर्भातील आदेश दिला आहे.
काळूराम गबाजी थोरवे, स्वामी पांडुरंग बांगर, भारती संभाजी जाधव, मनीषा आनंद घनवट, संतोष बबन घनवट (सर्व रा. वळक, पोस्ट टाकवे खुर्द, ता. मावळ, पुणे) अशी सदस्य रद्द झालेल्यांची नावे आहेत.
मावळ तालुक्यातील वळक ग्रामपंचायतीची निवडणूक २०१३मध्ये झाली होती. त्यामध्ये ७ जण निवडून आले होते. त्यानंतर सरपंचपदी अवंतिका रणपिसे यांची निवड झाली होती, तर उपसरपंचपदी काळूराम थोरवे यांची निवड झाली होती. काही कालखंडानंतर सदस्यांनी रणपिसे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. दरम्यानच्या कालखंडात ग्रामपंचायतीतील ५ सदस्यांनी वेळेवर निवडणूक खर्च सादर केला नाही.
याबाबत अवंतिका रणपिसे यांनी तक्रार दाखल केली होती. संबंधित सदस्यांनी वेळेत निवडणूक खर्च सादर केला नाही म्हणून त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार यावर सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून याबाबत माहिती घेतली असता संबंधित सदस्यांनी खर्च सादर न केल्याचे आढळून आले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी यांनी उपसरपंचासह ५ जणांचे सदस्यपद रद्द केले आहे.
तसेच पुढील २ वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश ८ जूनला दिला असून, तो गुरुवारी ग्रामपंचायतीला मिळाला आहे. अॅड. अकबर
शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. सचिन लोंढे यांनी कामकाज पाहिले, तर अॅड. जे. पी. धायलडक यांनी युक्तिवाद केला. (वार्ताहर)