म्हाडाच्या सदनिका सोडतीस अर्ज सादर करण्याकरिता 22 ऑक्टोबरपर्यंत मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 06:25 PM2017-10-12T18:25:27+5:302017-10-12T18:29:07+5:30
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतीतील ८१९ सदनिकांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील विविध वसाहतीतील 819 सदनिकांच्या विक्रीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीस अनुसरून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 22/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असून, अधिकाधिक नागरिकांनी आपल्या गृहस्वप्नपूर्ततेकरिता या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात 10 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाइन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी 21/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 22/10/2017 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबईतल्या म्हाडाच्या सुमारे 819 घरांसाठी ही लॉटरी काढण्यात आली आहे. दरवर्षी 31 मे रोजी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्याचा पायंडा आहे. यंदा मे उलटून गेला तरी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध न झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. अनेक जण यंदा लॉटरी नसेल असे कयास बांधूनही मोकळे झाले होते. मात्र यंदा उशीर झाला असला तरीही लॉटरीची जाहिरात दिलेली आहे, असं म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
यंदा पवई, चारकोप, विक्रोळी, कांदिवली, गोरेगाव, सायन, मानखुर्द आणि मुलुंड आदी भागांतील घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. मात्र तरीही जुलै महिन्यातच म्हाडा घरांची यादी प्रसिद्ध करेल, असे म्हाडानं सांगितलं होते. परंतु लॉटरीची जाहिरात गेल्या महिन्यात देण्यात आली. मुंबईत परवडणारं घरं घेणं प्रत्येक व्यक्तीला सहज शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहावी लागते. मात्र यंदा म्हाडाची लॉटरी फक्त 819 घरांसाठी असून, म्हाडाच्या घरांची कमतरता जाणवते आहे.