दहशतवादी सलिक होता नागपूर ‘एटीएस’ ला वॉन्टेड!

By admin | Published: November 1, 2016 02:42 AM2016-11-01T02:42:25+5:302016-11-01T02:42:25+5:30

औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला

The terrorist was a terrorist, the ATS has been wanted! | दहशतवादी सलिक होता नागपूर ‘एटीएस’ ला वॉन्टेड!

दहशतवादी सलिक होता नागपूर ‘एटीएस’ ला वॉन्टेड!

Next

नरेश डोंगरे,

नागपूर- भोपाळनजीक पोलिसांनी सोमवारी पहाटे कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी तिघांचे महाराष्ट्रात खास करून विदर्भ-मराठवाड्यातील नागपूर, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये जबरदस्त नेटवर्क होते. औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला होता. तर, या चकमकीनंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला मोहम्मद सलिख हा दहशतवादी नागपूर-औरंगाबाद एटीएसला ‘वॉन्टेड’ होता. गेल्या चार वर्षांपासून सलिखचा ताबा मिळावा म्हणून राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रयत्नरत होते. भोपाळ जेल ब्रेक आणि एन्काऊंटरनंतर ही खळबळजनक बाब उजेडात आली आहे.
भोपाळमध्ये जेल ब्रेक झाल्याचे वृत्त सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास स्थानिक सुरक्षा यंत्रणांना कळले. त्यानंतर मोहम्मद खालिद अहमद, शेख मुजीब, मजीद, अकील खिलजी, जाकीर, महबूब, अमजद आणि सलिख या दहशतवाद्यांच्या शोधार्थ एटीएस आणि पोलीस रेल्वेस्थानक तसेच नागपूर शहराला जोडणाऱ्या मध्य प्रदेशच्या सर्व मार्गावर शोधकार्य राबवू लागले. काही वेळेनंतर या सर्व दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्याचे कळाल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे पुढे येताच सुरक्षा यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली. कारण या आठ दहशतवाद्यांपैकी तिघे प्रत्यक्ष महाराष्ट्रातील घातपाती कृत्य तसेच घातपाताच्या कटकारस्थानाशी जुळलेले होते.
दहशतवादी मोहम्मद खालिद अहमद हा मूळचा सोलापूरचा निवासी होय. एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, तो प्रारंभी सिमीत सक्रिय होता. सफदर नागोरी आणि रियाज भटकळच्या संपर्कात आल्यानंतर खालिद खतरनाक दहशतवादी बनला. तो नंतर इंडियन मुझाहिदीनमध्ये (इंमू , सिमीची पुढची आवृत्ती) काम करू लागला. तपास यंत्रणांच्या नजरेत येताच तो महाराष्ट्रातून एकाएक गायब झाला. त्यावेळी सिमीवर बंदी येण्यापूर्वी राज्याचा महासचिव म्हणून काम करणारा जियाउद्दीन सिद्दीकी (औरंगाबाद) याच्या संपर्कात खालिद आला.
त्यानंतर सिमीचे राज्यभरात जोरदार नेटवर्क तयार झाले. औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात त्यांनी सिमीच्या स्लीपरची भलीमोठी फळी तयार केली. घातपाती कृत्य करण्यासोबतच सिमी-इंमूचे दहशतवादी स्लिपर्सच्या माध्यमातून बँका लुटून, दरोडे घालून फंड जमा करीत होते.
>चिखलीतही कटकारस्थान
औरंगाबाद चकमकीनंतर तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ झोकून पळून गेलेला मोहम्मद सलिख याचा शोध घेण्यासाठी एटीएस जंगजंग पछाडत होती. दरम्यान, औरंगाबाद चकमक आणि तत्पूर्वी चिखली (जि. बुलडाणा) जवळ त्याने कटकारस्थान केल्याचे तपासात पुढे आले होते. त्यामुळे त्याच्याकडून राज्यातील सिमीच्या नेटवर्कचा धक्कादायक खुलासा होऊ शकतो, अशी खात्री एटीएसला होती. त्याला खंडवा जेल ब्रेक प्रकरणात अटक झाल्याचे माहीत झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाद एटीएसने मध्य प्रदेशच्या सुरक्षा यंत्रणांकडे त्याचा ताबा मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, खंडवा प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला मध्य प्रदेशातून बाहेर काढण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे त्याचा ताबा स्थानिक एटीएसला मिळू शकला नाही. आज भोपाळच्या जेल ब्रेक आणि एन्काऊंटरमध्ये खालिद, खिलजीसोबत सलिखचेही नाव आल्याने तपास यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.

Web Title: The terrorist was a terrorist, the ATS has been wanted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.