गणितासह भाषेची कसोटी
By admin | Published: July 5, 2016 01:29 AM2016-07-05T01:29:01+5:302016-07-05T01:29:01+5:30
विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार
मुंबई : विद्यार्थ्यांची ‘गणित’ आणि ‘भाषा’ या विषयांच्या अभ्यासाची कसोटी लागणार आहे. कारण २४ ते ३० जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना पायाभूत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत ही पायाभूत चाचणी घेण्यात येणार असून, इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी असणार आहे.
विद्यार्थ्यांचे ‘गणित’ आणि ‘भाषा’ हे विषय कितपत पक्के आहेत? याचा आढावा याद्वारे लेखी स्वरूपात घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील खासगी, अनुदानित, विना-अनुदानित, अल्पसंख्याक शाळांना पायाभूत चाचणी घेणे बंधनकारक राहणार आहे. यंदा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे राज्यभरातील शाळांना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार असून, शाळेने २४ ते ३० जुलै या कालावधीत ही चाचणी घेणे अनिवार्य असणार आहे. गणित आणि भाषा विषयांवर आधारित ही चाचणी आहे. विद्यार्थ्यांना या विषयातील कितपत ज्ञान आहे, हे पाहण्यासाठी चाचणी घेतली जाते. या चाचणीतून विद्यार्थ्यांचा त्या विषयातील अभ्यास कितपत आहे ते कळते. (प्रतिनिधी)
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी अभ्यास करणार नाहीत अशी भीती पालकांना होती. या पायाभूत चाचणीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची एक प्रकारे उजळणीच होणार आहे.
- विद्या चव्हाण, पालक
पायाभूत चाचणी परीक्षेचा फायदाच झाला आहे. मुलांना गणित आणि भाषा विषयाचे ज्ञान आहे की नाही? हे शिक्षकांसोबत पालकांनासुद्धा कळते. या चाचणीसाठी विद्यार्थ्यांना विशेष अभ्यास करावा लागत नाही, अगदी साध्या-सोप्या आणि झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते. याचा विद्यार्थ्यांना फायदाच होतो.- स्मिता बटा, पालक
गेल्या वर्षी सहावीच्या विद्यार्थ्यांना तीन अंकी संख्येची बेरीज; असे प्रश्न विचारण्यात आले होते. सहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इयत्तेप्रमाणे प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका तयार कराव्यात. तरच या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. शिवाय पायाभूत चाचणीत ‘ड’ श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी काही विशेष तरतुदी कराव्यात.
- अनिता विचारे, शिक्षिका, पराग विद्यालय