नागपुरात सुरक्षा यंत्रणांची ‘कसोटी’
By admin | Published: November 23, 2015 02:26 AM2015-11-23T02:26:02+5:302015-11-23T02:26:02+5:30
दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली उपराजधानीत होऊ घातलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणांची ‘कसोटी’ लागली आहे.
नरेश डोंगरे, नागपूर
दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली उपराजधानीत होऊ घातलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने सुरक्षा यंत्रणांची ‘कसोटी’ लागली आहे. या सामन्यादरम्यान अघटीत घटना घडू नये म्हणून खेळाडूच नव्ह,े तर गेल्या तीन दिवसांपासून खेळपट्टी आणि स्टेडियमच्या परिसरातही सुरक्षेचे अभूतपूर्व उपाय करण्यात आले आहेत.
पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्याने जगभरात दहशतवादाची छाया गडद झाली आहे. त्यात मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टर मार्इंड सईद हाफिज याने पुन्हा भारतात हल्ला करण्याचे षड्यंत्र रचल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जामठा स्टेडियमवर २५ नोव्हेंबरपासून कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
त्यामुळे खेळाडूंचा मुक्काम असलेल्या हॉटेलभोवती सुरक्षा यंत्रणांनी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था केली आहे. खेळाडूच नव्हे तर खेळपट्टी भोवतीही नागपूर, वर्धा आणि भंडारा या तीन जिल्ह्याचे बॉम्बशोधक आणि नाशक पथक तीन दिवसांपासून गराडा घालून आहे. शेजारच्या इमारतीची आतून बाहेरून तपासणी केली जात असून, सामन्याच्या दरम्यान इमारतीचा वापर वॉच टॉवरसारखा केला जाणार आहे.