15 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी
By admin | Published: January 24, 2017 07:57 PM2017-01-24T19:57:32+5:302017-01-24T19:57:32+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाणार आहे. मंडळाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक / तोंडी 15 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत होणार आहे. त्याच कालावधीत विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाईल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाने दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय कल चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार गेल्या वर्षी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली. त्यास विद्यार्थी व शाळांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाईल. त्याचा अहवाल एप्रिल 2017 मध्ये आॅनलाईन स्वरुपात तसेच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर छापील स्वरुपात देण्यात येईल. त्यामुळे सर्व शाळांनी कल चाचचणीसाठी संगणक सुविधा तयार ठेवावी.
प्रत्येक शाळेने कल चाचणीच्या कामासाठी शाळेतील एका शिक्षकाची नियुक्ती करावी. तसेच त्याबाबतची माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदवावी. शाळांनी संगणक उपलब्धतेप्रमाणे विद्यार्थ्यांचे गट तयार करावेत. त्याच प्रमाणे नियोजित कालावधीत चाचणी घेण्याचे काम पूर्ण करावे. कल चाचणीस हजर राहणा-या विद्यार्थ्यांची उपस्थिती पत्रकात स्वाक्ष-या घेणे अनिवार्य असून प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षांच्या गुणपत्रकाबरोबर स्वाक्षरीची पत्रके विभागीय मंडळात जमा करणे बंधनकारक आहे. कल चाचणीचे साहित्य वितरण, प्रवेशपत्र वितरणाबरोबर केले जाणार आहे,असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.