पीटरसोबतच्या वादानंतर बनावट ई-मेल
By admin | Published: September 5, 2015 01:43 AM2015-09-05T01:43:25+5:302015-09-05T08:51:46+5:30
शीना गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जीने वडील पीटर यांच्यासमोर इंद्राणीवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पीटर आणि इंद्राणी यांच्यात शीनाच्या विषयावरून वरचेवर खटके उडू लागले
मुंबई : शीना गायब झाल्यानंतर राहुल मुखर्जीने वडील पीटर यांच्यासमोर इंद्राणीवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पीटर आणि इंद्राणी यांच्यात शीनाच्या विषयावरून वरचेवर खटके उडू लागले, वाद होऊ लागले. त्यानंतरच इंद्राणीने शीनाच्या नावे बनावट ई-मेल अकाऊन्ट तयार करण्याची शक्कल लढवली. तिने शीनाच्या नावे ज्यांना ई-मेल पाठवले, त्या प्रत्येकाला शीनाच आपल्याशी संवाद साधते, असे वाटत होते. पीटरनाही असेच वाटले व त्यांची खात्री पटली की शीना अमेरिकेत आहे. राहुल हा पीटर व त्यांची पहिली
पत्नी शबनम यांचा मुलगा. शीना व राहुल यांच्यात प्रेमसंबंध होते. तसेच त्यांचा साखरपुडाही झाला होता. इंद्राणीने राहुलला मात्र ई-मेल पाठवले नव्हते. कारण ती शीनाच्या मोबाईलवरून त्याला मेसेज पाठवत होती.
एकांतात इंद्राणीची भेट घेता यावी, अशी वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळली. इंद्राणीची भेट पोलिसांसमक्ष घ्यावी, असे आदेश दिले. त्यानंतर अॅड.
महेश जेठमलानी यांच्या सहकारी अॅड. मंगला यांनी इंद्राणीची भेट घेतली. मात्र या भेटींमध्ये वकील व इंद्राणी इंग्रजीतून संवाद साधतात हे लक्षात येताच पोलिसांनी या भेटीच्या वेळी इंग्रजी समजणाऱ्या अधिकाऱ्यांची ड्युटी लावल्याचे समजते.
मिखाईलला
दर महिना ४० हजार
आई-वडलांच्या देखभालीसाठी इंद्राणी मिखाईलला दरमहा ४० हजार रुपये देत असे. इंद्राणीकडून होत असलेल्या आर्थिक मदतीवर तो पूर्णपणे अवलंबून होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
मुखर्जी दाम्पत्याच्या मालमत्तेची चौकशी
महिन्याभरापासून मुंबई पोलिसांकडून पीटर व इंद्राणी मुखर्जी, शीना बोरा आणि तिचा सख्खा भाऊ मिखाईल यांच्या नावे असलेल्या मालमत्तेची सखोल चौकशी मुंबई पोलीस करीत आहेत. त्यासाठी पोलिसांनी चार्टर्ड अकाऊन्टन्टची मदत घेतली आहे.
मारियांच्या बदलीपूर्वी तपास पूर्ण करणार
बहुचर्चित व अत्यंत गुंतागुंत असलेल्या शीना बोरा हत्याकांडाचा तपास ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार खार पोलिसांनी केला आहे. कारण ३० सप्टेंबरनंतर मारिया यांची बढती होणार असून त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी अन्य अधिकाऱ्याच्या खांद्यावर येणार आहे.
आज रिमांड : इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपणार आहे. त्यामुळे पोलीस त्यांना पुढील रिमांडसाठी वांद्रे न्यायालयात हजर करतील.
गुन्हा सिद्ध होणारच :
या तपासात भक्कम पुरावे हाती आले असून त्याआधारे आरोपी इंद्राणी, संजीव व श्याम यांनीच शीनाची हत्या केल्याचे न्यायालयात सिद्ध करू, असा विश्वास खार पोलीस व्यक्त करत आहेत.
विधी खन्नाची चौकशी :
आरोपी संजीव खन्ना याची कन्या विधी हिची खार पोलिसांनी शुक्रवारी कसून चौकशी केली. विधी संजीव व इंद्राणी यांची कन्या असली तरी पीटर मुखर्जी यांनी तिला दत्तक घेतले होते.
पीटरला क्लीनचिट नाही
गेले तीन दिवस पोलीस पीटरची चौकशी करत आहेत. मात्र तिसऱ्या दिवसाच्या चौकशीनंतरही पोलिसांनी त्यांना क्लीनचिट दिलेली नाही. त्यांच्यावरील संशय कायम आहे.