कापड व्यापाऱ्यांचा जीएसटीविरोध सुरूच
By admin | Published: June 30, 2017 02:03 AM2017-06-30T02:03:38+5:302017-06-30T02:03:38+5:30
कापडावर लावण्यात आलेल्या ५ टक्के जीएसटीच्या निषेधार्थ देशभरातील कापड व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी कापड बाजार व दुकाने बंद होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कापडावर लावण्यात आलेल्या ५ टक्के जीएसटीच्या निषेधार्थ देशभरातील कापड व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी कापड बाजार व दुकाने बंद होती. काही ठिकाणी तीन दिवसांपासून तर काही शहरांत गेले दोन दिवस कापड बाजार बंद आहेत. आतापर्यंत कापड उद्योगावर कोणताही कर नव्हता. त्यामुळे जीएसटीही लावू नये, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे.
मुंबई, दिल्ली, कानपूर, सुरत, अहमदाबाद, जयपूर, लुधियाना, कोईम्बतूर, सेलम, तिरुपूर, मालेगाव आणि भिवंडी आदी शहरांतील घाऊक कापड बाजार त्यामुळे बंद आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांनीही काही तास वा दिवसभर दुकाने बंद ठेवली. कापडावर लावण्यात आलेला जीएसटी मागे घेण्यात यावा, अशी मागणी कापड उद्योगातर्फे करण्यात आली आहे. राजस्थानातील कापड व्यापारी ३0 ते ३ जुलैपर्यंत बंद पाळणार आहेत. तिथे कापडाच्या २४७ मोठ्या बाजारपेठा असून, त्यातून रोज सुमारे १२00 कोटी रुपयांचे व्यवहार होतात.
मुंबईतील प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळजी जेटा मार्केट, मंगळदास मार्केट, हिंदमाता मार्केट व गांधी मार्केटमध्येही शुकशुकाट आहे. तामिळनाडूमधील फेडरेशननेही बंद जाहीर केला असून, त्यामुळे तिरुपूर, सेलम, कोईम्बतूर, करूरमधील दीड लाखांहून अधिक पॉवरलूमधारक त्यात सहभागी झाले आहेत. कापड उद्योगावर आतापर्यंत करआकारणी नव्हती. आता जीएसटी लागू का करता, असा त्यांचा सवाल आहे.
आज निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन-
शुक्रवारी जीएसटी कौन्सिलची बैठक असून, त्यात कापड उद्योगावरील जीएसटी रद्द करण्यात यावा, अन्यथा आमचे आंदोलन सुरूच राहील, असे गुजरातमधील कापड व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर असताना तेथील कापड बाजार मात्र बंद होते.