नाशिकच्या नव्या ‘तेलगी’कडे बनावट नोटांचा छापखाना!
By admin | Published: December 27, 2016 04:37 AM2016-12-27T04:37:02+5:302016-12-27T04:37:02+5:30
१ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता छबू नागरे याचा बनावट नोटा छापण्याचा कारखानाच असल्याचे तपासात निष्पण्ण
नाशिक : १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा प्रकरणी अटकेत असलेला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता छबू नागरे याचा बनावट नोटा छापण्याचा कारखानाच असल्याचे तपासात निष्पण्ण झाले असून, तो किमान दोनशे कोटींच्या बनावट नोटा छापण्याच्या तयारीत होता. त्याच्याकडील अत्याधुनिक छपाई यंत्रणा बघून पोलीसही अचंबित झाले. हे प्रकरण म्हणजे देशभर गाजलेल्या स्टॅम्प घोटाळ्यातील तेलगीची पुनरावृत्तीच मानली जात आहे.
नाशिकमध्ये गेल्या गुरुवारी पोलिसांनी १ कोटी ३५ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी छबू नागरेसह ११ जणांना अटक केल्यानंतर रोज नवी माहिती समोर येत आहे. नागरेकडून २०० कोटींच्या बनावट नोटांची छपाई केली जाणार होती, अशी माहितीही आता समोर आली आहे. मात्र, तत्पूर्वीच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. नाशिक शहरातील खुटवड नगरमधील नागरे याच्या ओसम ब्युटीपार्लरमध्ये ही छपाई केली जात होती. पोलिसांनी तिथून प्रिंटर, स्कॅनर, शाई हस्तगत केली आहे .
तरीही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नाही
समांतर चलन छापणे हा राष्ट्रद्रोह असला तरी नाशिक पोलिसांनी अद्याप छबू नागरेवर तसा गुन्हा दाखल केलेला नाही.
गुन्ह्याचे स्वरूप आणि उद्देश बघून त्याबाबत निर्णय घेता येतो, असे तपासी पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच यासंदर्भात घटना आणि अन्य तरतूदी तपासून गुन्हा दाखल करू असे पोलीस सांगत आहेत.
नोटा खपविण्याची शक्कल
छबू नागरे याने अॅक्सेस मायक्रो फायनान्स मल्टीस्टेट को आॅप सोसायटीची स्थापना केली आहे. बनावट नोटा खपविण्यासाठी या सोसायटीचा वापर केला जात असल्याचा संशय असून नागरे याची पत्नी प्रीती नागरे या सोसायटीची शाखा व्यवस्थापक आहे. त्यामुळे या संस्थेमार्फत दिल्या गेलेल्या नोटांबद्दल सभासदांबरोबरच व्यवहारकर्त्यांमध्ये संशय निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
कोण आहे हा छबू नागरे?
छबू नागरे याचा पक्षाशी संबंध नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला असला तरी नागरे आजही राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचा पदाधिकारी आहे.
शिवाय, निमा या उद्योजकांच्या संघटनेवर विशेष कार्यकारिणी सदस्य म्हणूनही तो कार्यरत आहे. नागरे याच्यावर एमपीएससीचे पेपर फोडल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे.
तेलगी, स्टॅम्प अन् नाशिक
कोट्यवधींच्या मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार अब्दुल करिम तेलगीचे नाशिकशी असलेले संबंध जगजाहीर होते. त्यालाही राजकीय वरदहस्त होता, असे मानले जात होते.
बनावट नोटा प्रकरणी
अटकेत असलेला छबू नागरे हाही नाशिकचा असून हा निव्वळ योगायोग आहे का, अशी चर्चा आहे.