दररोज २५ लाख मीटर कापड उत्पादन थांबणार
By admin | Published: April 21, 2015 09:21 PM2015-04-21T21:21:36+5:302015-04-22T00:33:15+5:30
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कारवाई : नऊ प्रोसेसर्सचा पाणीपुरवठा तोडला; ऐन हंगामातील कारवाईमुळे वस्त्रोद्योगात खळबळ
राजाराम पाटील - इचलकरंजी -शहरातील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसर्सवरील कारवाईपाठोपाठ औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर बंदची कारवाई होणार असल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. ऐन हंगामात दररोज २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन ठप्प होण्याची भीती निर्माण झाल्याने उद्योजक हवालदिल झाले आहेत.
शहरात असलेल्या ६६ प्रोसेसर्समधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्राथमिक प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात (सीईटीपी) नेले जाते. तेथे प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी बाहेर सोडले जाते. तर त्यातून निर्माण होणारा ‘स्लज’ नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यात पाठविला जातो. इचलकरंजीतील गेल्या तीन वर्षांच्या सीईटीपीच्या पाण्याचा अहवाल राज्यात अव्वल आहे. याशिवाय अन्य ठिकाणच्या तुलनेत येथील सीईटीपीचा स्लज प्रमाणाने अधिक आहे. असे असतानाही येथील नऊ प्रोसेसर्सवर झालेल्या बंदच्या कारवाईचे उद्योजकांना आश्चर्य वाटत आहे.सीईटीपीतील प्रक्रिया केलेले पाणी शेती, सिंचन, वनीकरणासाठी वापरले पाहिजे. मात्र, येथील सीईटीपीचे पाणी बाहेर ओढ्यात सोडले जाते. त्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीईटीपीला १० दिवसांची नोटीस दिली असून, त्याची मुदत पुढील आठवड्यात संपते. परिणामी, सीईटीपी बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेले ६६ प्रोसेसर्सही बंद पडणार आहेत. त्यामुळे दररोज २५ लाख मीटर कापडावरील प्रक्रिया ठप्प होणार आहे आणि आपोआपच २५ हजार यंत्रमागही बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. सध्या यंत्रमाग कापडाच्या विक्रीचा हंगाम जोरदार असतानाच येथील वस्त्रोद्योगावर होणाऱ्या या परिणामामुळे यंत्रमाग व प्रोसेसर्स उद्योजक धास्तावले आहेत.दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सूचनापत्रानुसार इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील पाच प्रोसेसर्स कारखान्यांचा नळपाणी पुरवठा तोडला. त्यामध्ये राधा-कन्हैय्या एक इंची, सावंत एक इंची, अरविंद कॉटस्पिन दोन इंची, राधामोहन अर्धा इंची व यशवंत तीन इंची या नळ जोडण्यांचा समावेश आहे. उर्वरित रघुनंदन, लक्ष्मी, हरिहर व डेक्कन या प्रोसेसर्सकडे नळ जोडणी नाही.
कोकणात जाणार-अचानकपणे प्रोसेसर्स बंद करण्याच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही प्रोसेसर्सधारकांची बैठक स्टेशन रोडवरील एका प्रोसेसर्समध्ये झाली. प्रदूषण मंडळाने हेतूपुरस्सर नऊ प्रोसेसर्सवर कारवाई करताना उच्च न्यायालयातील २३ एप्रिलच्या तारखेचा आधार घेतला व न्यायालयाला काही तरी दाखविण्यासाठी प्रोसेसर्सवर आघात केला, अशी टीका या बैठकीत करण्यात आली. तसेच प्रोसेसर्स कारखाने कोकणात हलविण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात आला.
अहवाल आणि वर्षानंतर कारवाई
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रोसेसर्सवरील बंदची कारवाई करण्यासाठी कायदेशीररीत्या असलेली कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. मंगळवारपासून नऊ प्रोसेसर्स बंद झाल्याने सुमारे १२ लाख मीटर कापडावरील प्रक्रिया ठप्प झाली. तर दोन हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रोसेसर्सवर बंदची थेट कारवाई करताना गतवर्षीच्या ‘निरी’च्या उच्च न्यायालयातील अहवालाकडे बोट दाखविण्यात आल्याने प्रोसेसर्सधारक अस्वस्थ झाले आहेत.