ग्रंथांची फुटली पेढ...

By Admin | Published: April 30, 2017 02:37 AM2017-04-30T02:37:27+5:302017-04-30T02:37:27+5:30

सगळ्याच नव्याची नवलाई असते त्याची गोष्ट. विशेषत: बायकांना तेव्हा खरेदीच्या वेळी नवरा बरोबर असावासा वाटतो. निदान साडी खरेदीच्या वेळी नक्कीच.

Texts | ग्रंथांची फुटली पेढ...

ग्रंथांची फुटली पेढ...

googlenewsNext

- रविप्रकाश कुलकर्णी

सगळ्याच नव्याची नवलाई असते त्याची गोष्ट. विशेषत: बायकांना तेव्हा खरेदीच्या वेळी नवरा बरोबर असावासा वाटतो. निदान साडी खरेदीच्या वेळी नक्कीच. बिचारा ‘हा’ तेव्हा जातोच ‘मी येऊन काय करणार आहे?’ हा विचार मनातल्या मनात दाबून. नव्या नवलाईचे असेच असते नाही?
तर असेच एक नवपरिणीत असे जोडपे साडी खरेदीला निघाले, पण झाले काय, वाटेत क्रॉस मैदानावर भले मोठे ग्रंथ प्रदर्शन भरले होते हे दिसले. तेव्हा तो ‘तिला’ म्हणाला, ‘चल, ग्रंथप्रदर्शनात फेरफटका मारू या...’
अर्थात, बायकोची संमती आहे हे गृहित धरून हा ग्रंथप्रदर्शनात शिरलादेखील. बायको बरोबर आली की नाही, हेदेखील त्याने पाहिले नाही. हा ग्रंथ बघ, थोडा चाळ. वाटले तर ग्रंथखरेदी असे रेंगाळत रेंगाळत चालले होते. हे किती वेळ चालले होते? तर याच्या खिशातले सर्व पैसे आता संपले आहेत, हे लक्षात आल्यानंतर. अर्थात, साडी खरेदी राहून गेली. मग नंतर काय झाले असेल हे तुम्ही चाणाक्ष वाचक असल्यामुळे ओळखले असेलच...
पण खरी गोष्ट त्या नंतरचीच आहे!
आताशा ती दोघे साडी खरेदीला एकत्र जातच नाहीत, पण दोघे एक त्र कुठे जायला निघालेच आणि वाटेत ग्रंथप्रदर्शन वा पुस्तकाच्या दुकानात जायची वेळ आलीच, तर बाईसाहेब एकच गोष्ट करतात. नवऱ्याच्या खिशातले पैशाचे पाकीट काढून घेतात आणि म्हणतात, ‘तुम्हाला काय पुस्तके पाहायची, घ्यायची ती घ्या. मी इथे बाहेरच थांबते, तुमचे झाले की, मग काय खरेदी वगैरे करायची तिकडे जाऊ...’
हे पाहिले की, ‘चतुर किती ललना...’ म्हणतात ते खरेच, पण आता अनुभवातून गेलेल्या समस्त ग्रंथप्रेमींना आणि तोदेखील प्रथमच दिलासा दिला, तो डोंबिवलीत भरलेल्या पुस्तक आदान-प्रदान योजनेने. त्याचे सर्व श्रेय जाते पै. फ्रेंडस्, लायब्ररीच्या पुंडलिक पै यांच्याकडे. ग्रंथप्रेमी प्रत्येकाकडे स्वत:चा म्हणून ग्रंथसंग्रह असतोच, पण कित्येकदा वाचून झालेल्या, पण संग्रहात नको असलेल्या पुस्तकांचे काय करायचे, असा मोठा प्रश्न निर्माण होतो. अनेक वाचनालयात ठेवायला जागा नाही, म्हणून जुनी पुस्तक ‘भेट’ म्हणून स्वीकारत नाहीत. पुस्तके रद्दीत टाकणे क्लेशदायक असते... अशा वेळी मार्ग कोणता? ही समस्या ओळखूनच पै यांनी एक योजना मांडली. तुमच्याकडची चांगल्या अवस्थेतील पुस्तके आमच्याकडे जमा करा. अशा सगळ्या पुस्तकांचे प्रदर्शन भरेल. त्यातून तुम्हाला हवे असलेले पुस्तक तुम्ही घेऊ शकता. या सर्व व्यवस्थेसाठी, प्रत्येक पुस्तकामध्ये दहा रुपये सर्व्हिस चार्ज एवढीच ती काय अट.
ही पुस्तके आदान-प्रदान योजना किती यशस्वी व्हावी? तर उद्घाटन सकाळी १० वाजता होणार होतं, पण त्याच्या आधी पासूनच आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी ग्रंथप्रेमिकांनी तुफान गर्दी केली, वेळेच्या आधीच ही उत्सुकता दिसत होती आणि तीदेखील रविवारसारख्या दिवशी म्हणजे पहा...
पण उद्घाटक वेळेवर आले नाहीत. आयोजकांची पंचाइत झाली. ग्रंथप्रेमीही अस्वस्थ झाले. ही अस्वस्थता प्रदर्शन कमिटीतील डॉ. महेश ठाकूर यांना नेमकी जाणवली. त्यांनी आपल्या इतर सहकार्याची अनुमती घेऊन जाहीर केले की, ग्रंथप्रेमिकांना मंडपात पुस्तक निवडण्यासाठी जाऊ द्यावे. औपचारिक उद्घाटन उद्घाटक आल्यानंतर होईल! या निर्णयाचा इतके स्वागत झाले की, ग्रंथप्रेमी मंडळी झुंडीनी आत शिरली. आपल्याला हवा असलेल्या ग्रंथ कधी मिळतो, अशी ती ओढ होती. यासाठी महेश ठाकूर यांचे खरे तर आभार मानले पाहिजेत. याचेदेखील त्यांना भान राहिलं नाही...
या योजनेत कुठले पुस्तक होती?
दासबोध-ज्ञानेश्वरीपासून मृत्युंजय, स्वामीसारख्या सगळ्या पुस्तकांची रेलचेल होती. ‘लमाण’ होतं, ‘राजा शिवछत्रपती’ होते, अशी लोकप्रिय पुस्तके होतीच, पण काही अप्राप्य पुस्तकेदेखील होती. जोडीला आठ दिवस विविध प्रकारची भाषणे-चर्चा असे वेगवेगळे कार्यक्रम होते ते वेगळेच. हा यंदाचा वसंतोत्सव आगळा वेगळाच. रोज लोक वेगवेगळी पुस्तके आणून देत होती आणि त्या बदल्यात त्यांना हवी असलेली पुस्तक घेऊन जात होती. हे पाहून खऱ्या अर्थाने ‘ग्रंथाची फुटली पेढ...’ असे वाटायला लागले.
अर्थात, याला वेगवेगळ्या स्पॉन्सर्सची प्रायोजकांची साथ होती, म्हणूनच हे शक्य झाले. एरवी ही गोष्ट अशक्यच. आता हे कसे झाले? त्यासाठी पुंडलीक पै ना गाठायला हवे!

Web Title: Texts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.