ठाकरे बंधूंचे परस्परपूरक राजकारण
By admin | Published: January 12, 2015 03:48 AM2015-01-12T03:48:50+5:302015-01-12T03:48:50+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ‘मिशन १००’ आणि नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेबरोबर सरसकट युती अशक्य
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ‘मिशन १००’ आणि नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेबरोबर सरसकट युती अशक्य असल्याचे दिलेले संकेत या पार्श्वभूमीवर उद्धव व राज ठाकरे यांनी परस्परपूरक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडली. त्या वेळी केंद्र सरकारमधील मंत्रिपद शिवसेनेने सोडले नाही. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावत भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेना अगोदर विधानसभेत विरोधी पक्षात बसली व त्यानंतर सत्तेत सहभागी झाली. सेनेच्या या कोलांटउड्यांनंतर शिवसेना-मनसे संबंध कसे राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल होते. मात्र भाजपाच्या ‘धोका’तंत्राविरोधात प्रसंगी एकत्र येण्याच्या हालचाली ठाकरे बंधूंनी सुरू केल्या आहेत. भाजपाने युती नाकारल्यास कल्याण-डोंबिवली, मुंबई पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ठाकरे बंधू परस्परपूरक राजकारण करू शकतात, असे निकटवर्तीयांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)