ठाकरेंच्या संकल्पनेतून 10 रुपयांत जेवणाच्या थाळीचा शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 02:29 PM2019-12-19T14:29:26+5:302019-12-19T14:59:01+5:30
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 10 रुपयात जेवणाची थाळी याचा शुभारंभ बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालय उपाहारगृह येथून सुरू करण्यात येत आहे.
मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 10 रुपयात जेवणाची थाळी याचा शुभारंभ बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालय उपाहारगृह येथून सुरू करण्यात येत आहे. आज 19 डिसेंबर 2019 दुपारी 1.30 वाजता मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखाताई राऊत, पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची प्रमुख उपस्थिती होत आहे.
शिवसेनेने वचननाम्यामध्ये 10 रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात शिवसेनेने 10 रुपयांत, तर भाजपने 5 रुपयांत पोटभर जेवण देण्याची सवंग घोषणा निवडणुकीपूर्वी केली असली, तरी त्याआधीच अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकीतून जेवणाच्या दर्जात तडजोड न करता 10 रुपयांत जेवण देणे शिवसैनिकांनी शक्य करून दाखविले आहे. शिवसैनिकांकडून अनेकांच्या जेवणाची सोय केली जाते. ते देत असताना त्याचा दर्जा सांभाळला जाण्याचीही गरज आहे.
गॅस, तेल आणि गहू यापैकी दोन वस्तू मदत स्वरूपात मिळाल्यास 10 रुपयांत दर्जेदार जेवण देणे शक्य आहे. प्रत्येक वाराची भाजी निश्चित असल्याने त्या प्रमाणात धान्य भरले जाते. त्यात मूग, मटकी, सोयाबिन, शेवभाजी, छोले यांचा प्रामुख्याने समावेश असतो. काही व्यक्ती या उपक्रमास स्वत:हून मदत करतात. प्रत्यक्षात एकवेळचे जेवण देताना प्रत्येक ताट हे 20 रुपयांच्या घरात जाते. परंतु ते 10 रुपयांत देत असताना त्यासाठी काही दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत होते.