डुप्लिकेट शिवसेनेचा नेता कोण हे सांगावे; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 12:04 PM2023-06-05T12:04:02+5:302023-06-05T12:04:35+5:30
आमचे उद्धव ठाकरेंचे सरकार होते, एकदा दिल्लीत गेले. सर्व निर्णय इथे व्हायचे. दिल्लीची गुलामी आम्ही केली नाही असं राऊतांनी सांगितले.
मुंबई - शिवसेनेला कधी दिल्लीवारी करायला लागत नाही. ही खरी शिवसेना असेल, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर तो दिल्लीत कशाला जाईल? मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीत जाऊन परवानगी मागण्याची गरज काय? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे दिल्लीत अर्ज घेऊन उभे राहिले नाहीत. डुप्लिकेट शिवसेनेने त्यांचा नेता कोण सांगावे. बाळासाहेब ठाकरे की मोदी-शाह आहेत ते सांगावे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, फडणवीस गेले, इतर नेते गेले मान्य करतो, तुमचे काय आहे? फारच विचित्र प्रकार आहे. आमचा विस्तार आम्ही करायचो. हा महाराष्ट्र आहे. पण यांचे ऊठसूठ दिल्लीत जायचे, ही महाराष्ट्राची शिवसेना नाही तर गुलामांची आहे. शिंदे यांचे हायकमांड दिल्लीत आहेत. शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतात आणि दिल्लीत जाऊन मुजरा करता. खरी शिवसेना कधी दिल्लीत जाऊन कुणासमोर झुकली नाही. प्रत्येक कामासाठी दिल्लीत जातात. खरी शिवसेना असती तर दिल्लीत जाण्याची गरज भासली नसती. महाराष्ट्रातले निर्णय इथेच व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच आमचे उद्धव ठाकरेंचे सरकार होते, एकदा दिल्लीत गेले. सर्व निर्णय इथे व्हायचे. दिल्लीची गुलामी आम्ही केली नाही. अमित शाहने निवडणूक आयोगावर दबाव टाकून शिवसेना दिलीय ना, मग चालवा. त्यांच्यासमोर झुकून उभे का राहतात. तुमच्यात हिंमत असेल तर मंत्रिमंडळ विस्तार इथं बसून करा. १ वर्ष झाले विस्तार होत नाही त्याचे कारण हे सरकार राहत नाही. या सरकारवर टांगती तलवार आहे. केवळ वेळ काढण्याचा हा प्रकार आहे अशी टीकाही राऊतांनी केली.
अपघाताचाही इव्हेंट केला जातोय हे कधी झालं नाही
३ ट्रेन एकमेकांना आदळणे, सुरक्षा कवचचं काय झाले? बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन घोषणा करतात. ज्या ट्रेन देशात चालतायेत त्या सुरक्षित चालवा, वंदे भारत हा प्रचार आहे. जमिनीवर काहीच नाही. हा रेल्वे अपघात इतका भयंकर आहे की मृतांवर झाकायला कपडाही नव्हता. हा अपघात नव्हता तर घातपात आहे पण सरकार काय करतंय? या अपघाताची जबाबदारी कुणावर आहे? रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी नाही का? लालबहादूर शास्त्रींच्या काळात अपघात झाल्यानंतर तातडीने त्यांनी राजीनामा दिला. अपघाताचाही इव्हेंट केला जातोय हे देशात कधी झालं नव्हते असं संजय राऊतांनी आरोप केला. त्याचसोबत सीबीआय चौकशी हा वेळकाढूपणा आहे. देशाचे पंतप्रधान राजीनामा देणार का? स्मशानातसुद्धा इव्हेंट करतायेत. अपघाताची पाहणी करायला गेले तेव्हा समोर गर्दी करून मोदी मोदी घोषणा दिल्या जातायेत. तांत्रिक विभागाचे अपयश आहे. सीबीआय काय करणार? असा सवालही उपस्थित केला.
कुणाची ताकद किती जनता ठरवेल
महाविकास आघाडीत कुणाची ताकद किती हे जनता ठरवेल. आता बोलून काय उपयोग नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत दिसेल. मुंबईतील काही भागात काँग्रेसची ताकद आहे हे मान्य आहे. परंतु मुंबई असो वा इतर महापालिका निवडणुकीबाबत आम्ही एकत्र बसून चर्चा करू. माध्यमांसमोर जागावाटप ठरत नाही. अजित पवार असतील आणि काँग्रेस नेते असतील, मुंबई असो वा इतर महापालिका निवडणुका असतील आमच्या सगळ्यांचा एकच सूर आहे एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढायच्या. प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा पराभव करायचा हा निर्धार आहे. आम्ही त्याबाबत लवकर भूमिका घेऊ अशी माहिती संजय राऊतांनी दिली.