वेळीच 'सामना' वाचला असता, तर आज सामना झाला नसता; ठाकरेंचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 02:44 PM2019-12-17T14:44:24+5:302019-12-17T14:44:48+5:30
विधानसभेत शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष आक्रमक झाला होता. यावेळी सामनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या बातमीचा संदर्भ देत विरोधक सभागृहात सामना पेपर घेऊन आले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.
नागपूर - महाविकास आघाडीसाठी आणि पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी सध्या सुरू असलेले अधिवेशन तयारी अभावी जड जाताना दिसत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सामना वृत्तपत्रावरून टोला लगावला आहे.
विधानसभेत शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष आक्रमक झाला होता. यावेळी सामनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या बातमीचा संदर्भ देत विरोधक सभागृहात सामना पेपर घेऊन आले होते. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात झालेल्या गोंधळावरुन भाजपाला लक्ष्य केलं. विरोधकांनी सभागृहात समस्या मांडायच्या असतात, पण हा गोंधळ बरा नव्हे. केंद्राकडून राज्याला येणारा 15 हजार कोटींचा परतावा मिळण्यास सुरुवात झाली आहे. साधारण 4 ते 4.5 हजार कोटी रुपयांचा पहिला हफ्ता राज्याला मिळाल्याचे उद्धव यांनी सांगितले.
दरम्यान भाजप नेते जी घोषणाबाजी सभागृहात करतायेत, ती केंद्रातल्या सरकारकडे करायला पाहिजे होती, असं सांगत जे लोकं 'सामना' वाचत नाही म्हणत होती, तीच लोकं आज सामना वर्तमानपत्राचे पोस्टर्स घेऊन सभागृहात आली होती. फडणवीसांनी आधीच सामना वाचला असता तर आज आमचा आणि त्यांचा सामना झाला नसता, असा टोला उद्धव यांनी लगावला. तसेच आजच्या घटनेवरून आम्ही सामनाच्या माध्यमातून जनतेचे विषय मांडत होतो, हे फडणवीसांनी कबूल केल्याचे, ठाकरे यावेळी म्हणाले.